पिंपरी : महापालिकेतील सत्ताधार्यांनी सभा कामकाजात आयत्यावेळी चुकीच्या पद्धतीने विषय घुसडले. नगरसेवकांना देखील त्याची माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत आयत्यावेळी विषय घेण्यास नगरसेविका मंगला कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला. तसेच तहकूब सभेत कोणत्या नियमाच्या आधारे विषय दाखल करुन घेतले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मागील सभेत 26 विषय
हे देखील वाचा
महापालिकेची सप्टेंबर महिन्याची तहकूब सभा गुरुवारी आयोजित केली होती. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 19 सप्टेंबर रोजी तातडीची बाब म्हणून पिंपरी विधानसभा मतदार संघातील दुबार मतदार, मृत मतदारांची नावे वगळण्याचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर महापालिकेतील एका नगरसेवकाची नियुक्ती करण्याचा असे दोन विषय आयत्यावेळी महासभेसमोर दाखल केला होते. तर, विषयपत्रिकेवर रितसर 24 विषय होते, असे एकूण 26 विषय होते. तथापि, 19 सप्टेंबरच्या महासभेत गोंधळ झाल्याने महासभा तहकूब झाली होती.
चुकीच्या पद्धतीने मंजुरी
तहकूब सभा आज पार पडली. महासभेत विषयपत्रिकेवरील 24 आणि आयत्यावेळी दाखल करुन घेतलेल्या दोन अशा 26 विषयांना मान्यता दिली. त्यानंतर आणखीन तीन विषयांना मान्यता देण्यास सत्ताधा-यांनी सुरुवात केली. याला माजी महापौर मंगला कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला. हे तीन विषय आयत्यावेळी घेतले आहेत. त्याची नगरसेवकांना माहिती दिली गेली नाही. नगरसेवकांना अंधारात ठेऊन विषय मंजूर करणे अत्यंत चुकीचे आहे. तहकूब सभेत विषय कसे दाखल करुन घेतले जातात? असा खडा सवालही त्यांनी केला. सत्ताधारी आणि प्रशासन चुकीच्या पद्धतीने विषय घूसडून मंजूर करुन घेतात, असेही त्या म्हणाल्या.