सर्वसाधारण सभेत सदस्यांनी वाचला तक्रारीचा पाढा

0

जळगाव । 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी 14 रोजी पार पडली. निवडणुक होऊन पाच महिने उलटल्याने झेडपी सदस्यांकडे सभेत मांडण्यासाठी अनेक प्रश्‍न होते. सभेत सर्वाधिक तक्रारी ह्या अधिकार्‍यांबद्दलच करण्यात आल्याचे दिसून आले. अधिकार्‍यांबद्दलच्या तक्रारींचा पाढा यावेळी सदस्यांनी वाचला. अधिकार भेटत नाही, फोन घेत नाही, वेळेवर काम करत नाही, चुकीचे कामे करतात अशा तक्रारी सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी सभेत मांडल्या. जिल्हा परिषदेतील छत्रपती शाहू महाराज सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील आदी उपस्थित होते.

सदस्यांनी फेकले माईक
सर्वसाधारण सभेवर हजारो रुपयाचा खर्च करण्यात येतो मात्र सभेसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आले नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सदस्यांना प्रश्‍न मांडतांना देण्यात आलेले माईक नादुरुस्त होते त्यामुळे सदस्यांचा आवाज व्यासपीठापर्यत जाण्यास अडचण होत होती. यावरुन सदस्य चिडले त्यांनी माईक फेकत प्रशासनाला नियोजनाबाबत जाब विचारला. निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा अधिक भरणा असल्याने तसेच सभा चालविणेबाबतचा प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे वारंवार दिसून येते.

सीआयडी चौकशीची मागणी
जिल्ह्यातील शाळांमध्ये आढळून आलेले निकृष्ट पोषण आहार धान्याचे नमुने झेडपी सदस्य पल्लवी सावकारे, माधुरी अत्तरेद, जयपाल बोदडे, रविंद्र पाटील, शशिकांत साळूंखे यांनी व्यासपीठावरील अधिकारी, पदाधिकारी यांना दाखविले. संबंधीत पुरवठादाराला देण्यात आलेला ठेका रद्द करण्यात येऊन पोषण आहार घोटाळ्याची चौकशी सीआयडी ( गुन्हे अन्वेषण) विभागामार्फत करण्यात यावी अशी मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सीआयडी चौकशीचा ठरात सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला असून शासनाकडे संबंधीत चौकशीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

पहिलाच विषय नामंजुर
सभेचा पहिल्याच विषयावरुन सभेत वादंग निर्माण झाले. मागील सभेचा इतिवृत्त वाचून कायम करण्याचा पहिला विषय मंजुरीसाठी मांडण्यात आला. मात्र कोणत्याही सदस्याला इतिवृत्त देण्यात आलेले नसल्याने विषय मंजुर करण्यास सर्व पक्षीय सदस्यांनी याला विरोध केला. मागील सभेत कोणता ठराव मांडण्यात आला याविषयी माहिती नसतांना आम्ही हा विषय मंजूर कसे करु असा प्रश्‍न करत प्रशासनाची चुक असल्याने प्रशासनाने ती मान्य करावी असा घाट सदस्यांनी घातला. शेवट प्रशासनाने चुक मान्य केली.

समिती वाटपात जातीय राजकारण
जिल्हा परिषदेची महत्वपुर्ण समिती ही स्थायी समिती असते. स्थायी समितीच्या माध्यमातून सर्व विषय हाताळले जातात. त्यामुळे अधिकाधिक सदस्यांची स्थायी समितीत स्थान मिळावे यासाठी प्रयत्न असते. जळगाव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत सदस्य निवड करतांना अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील एकही सदस्यांना स्थान देण्यात आले नसल्याने जातीय राजकारण करण्यात आल्याचे आरोप झेडपी सदस्य जयपाल बोदडे यांनी केले. तसेच त्यांनी कलम 83 (5) नुसार बांधकाम समितीचे खातेवाटप नियमबाह्य करण्यात आल्याने न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

टीसीएल पुरवठा नाही
पावसाळा सुरु झाला असून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. दुषीत पाण्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची लागण होत असून प्रशासनाने जलशुध्दीकरणासाठी प्रयत्न करायला हवे. मुक्ताईनगर तालुक्यात टीसीएल पावडरचा पुरवठा करण्यात आलेला नसल्याने अनेकांना जलजन्य आजाराची लागण झाल्याचा मुद्दा जयपाल बोदडे यांनी उपस्थित केला असता. टीसीएल खरेदीचा विषय आयत्या वेळी मांडत असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी सुनंदा नरवाडे यांनी सांगितले असता आरोग्याचा प्रश्‍न असून मंजुरीची गरज नसल्याचे सांगत सदस्यांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला. तुमच्याशी काम होत नसेल तर राजीनामा देऊन टाका अशा शब्दात सदस्यांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला. उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी नरवाडे यांना तुमच्या बद्दल अधिक तक्रारी येत असल्याचे लक्षात आणुन दिले.

प्रताप पाटलांचा आरोप
धरणगाव तालुक्यात जलसिंचनाचे कामे हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता के.पी.नाईक यांनी आणि ठेकेदाराने मिळून सिंचनाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी केला. त्रयस्थांमार्फत जलसिंचनाच्या कामाची चौकशी करत कमी कामे करुन जास्त पैसे लाटण्याचे काम करत असल्याचे आरोप केला. चांगली कामे न केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला. नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, डॉ.मंगला पाटील यांनी सिंचनाच्या कामावरुन प्रश्‍न उपस्थित केले. प्रथमच होत असलेल्या सर्वसाधारण सभेत काही मुद्दे अभ्यासूपणे मांडले गेले.