नवी दिल्ली-पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. घरगुती वापराचा गॅस ८०० रूपयांच्या घरात गेला आहे. महागाईमुळे सर्व सामान्यांचे कंबरडे पार मोडले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नावरून सोयीस्कररित्या चुप्पी साधली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांचे मौन का? असा प्रश्न विचारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली.
दिल्लीत रामलीला मैदानावर १६ विरोधी पक्ष सरकारविरोधात एकत्र आले आहेत. देशात काँग्रेसने सरकाविरोधात आणि वाढत्या महागाई व इंधन दरांविरोधात बंदची हाक दिली आहे. त्यादरम्यान राहुल गांधी बोलत होते.
आज इतर विरोधी पक्षही आमच्यासोबत देशव्यापी संपात आमच्यासोबत सहभागी झाले आहेत ही समाधानाची बाब आहे. आपण सगळे एकत्र येऊन नरेंद्र मोदींना हटवू शकतो असाही नारा यावेळी राहुल गांधी यांनी दिला. यावेळी नोटाबंदीच्या निर्णयावरही राहुल गांधी यांनी टीका केली. नोटाबंदीचा निर्णय हा मोजक्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी झाला. काळा पैसा बाहेर येणार होता त्याचे काय झाले? भ्रष्टाचार कमी झाला का? असेही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले. इतकेच नाही तर जीएसटीवरही त्यांनी टीका केली.जीएसटीच्या अंमलबजावणीत केंद्र सरकारने एवढी घाई का केली? असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.