सर्वसामान्यांच्या हितासाठी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा

0

मुंबई:- महाराष्ट्रात डॉक्टरांवर वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संघटनांनी संप पुकारल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यासंबंधी डॉक्टरांना सुरक्षेची हमी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, डॉक्टरांवरील हल्ले निषेधार्ह आहेत. या प्रकारच्या घटनांमधील हल्लेखोरांवर सरकारने वेळोवेळी कठोर कारवाई केली आहे.सरकार डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र काही नादान वृत्तीच्या लोकांमुळे सामान्य रुग्णांचे हाल होणे चुकीचे असून डॉक्टरांनी संप मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत चर्चा करून सुरक्षेची हमी देताना अशा घटनांमध्ये सरकार आग्रही भूमिका घेईल आणि दोषींना कठोरात कठोर शासन होईल, असे प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. संप मागे घेत आमच्याशी चर्चा करावी, मार्ग काढण्यासाठी सरकार तयार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुरेपूर प्रयत्न
– मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, डॉक्टरांच्या सुरक्षेकरीता वेळोवेळी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्या त्‍या वेळच्या घटनांमध्ये सरकारने आग्रही भूमिका घेतली असून यापुढेही अशी भूमिका राहणार आहे. डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडल्यानंतर जे संप होतात, त्यामध्ये सर्वाधिक हाल गरीब रुग्णांचे होतात. अशा नालायक हल्लेखोरांमुळे डॉक्टरांमध्ये तयार झालेल्या असुरक्षिततेच्या आणि असंतोषाच्या भावनेची सरकारने दखल घेतली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केली कळकळीची विनंती
– अशा घटनांमुळे गरीब, गरजु रुग्णांना शुश्रूषा नाकारणे हे देखील योग्य नाही, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या संघटनांना विनंती केली. ते म्हणाले की, राज्य सरकारने संघटनांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. गत दोन, तीन दिवस सरकार सातत्याने चर्चा करीत आहे. राज्य सरकार संपूर्ण पाठीशी असतानाही डॉक्टरांचा संप सुरु असल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या आहेत. डॉक्टरांचे प्रोफेशन हे नोबेल मानले जाते. त्यांना देवाचा दर्जा समाजाकडून दिला जातो. एखाद्या अपप्रवृत्तीमुळे निरपराध रुग्णांना त्याची शिक्षा भोगायला लावणे, हे देखील चुकीचे असल्याचे सांगत डॉक्टरांनी तत्काळ संप मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. डॉक्टरांच्या संघटनांनी, सामान्य माणसाच्या कल्याणाकरीता, हिताकरीता, रुग्ण सेवा देण्याकरीता सेवेमध्ये परत यावे व वैद्यकीय सेवेची जी शपथ घेतली आहे, त्याचं सर्व डॉक्टरांनी पालन करावे अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.