नवी दिल्ली: सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा महागाईचा झटका बसणार आहे. गॅसच्या दरात तब्बल १५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. आज बुधवारपासून ही वाढ लागू झाली आहे. याआधी 1 जानेवारी रोजी बजेट मांडण्यापूर्वी गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या होत्या. कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये 224.98 रुपयांची वाढ झाली होती.
दिल्लीमध्ये 14 किलो गॅस सिलिंडर 858.50 रुपयांना मिळणार असून त्याच्या किंमतीत 144.50 रुपयांची वाढ करण्यात आले आहे. कोलकातामध्ये सिलिंडरच्या किंमतीत 149 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता ती 896 रुपये असणार आहे. तर मुंबईकराना गॅस सिलिंडरसाठी 829 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत गॅसच्या किंमतीत 145 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच चेन्नईमध्ये 147 रुपयांची वाढ करण्यात आली असून 881 रुपये द्यावे लागणार आहेत.