सर्वसामान्य नागरिकांमुळेच लोकशाही जीवंत

0

पुणे । शहरापासून ते गावात राहणार्‍या सर्वसामान्य नागरिकांमुळेच देशातील लोकशाही जिवंत असल्याचे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले. राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात संचलित रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानचा ’प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार’ महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना प्रदान करण्यात आला. प्रा. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे उपस्थित होत्या. त्यावेळी ते बोलत होते. पुणे पत्रकार भवनात हा कार्यक्रम पार पडला. पिंपरी-चिंचवडचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, अभिनंदन थोरात आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

…तर होईल राज्याचा विकास
सर्वसामान्य माणूस हा मदत केल्याचे कधीही विसरत नाही. ते मदत करणार्‍यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यामुळे या भागाचा विकास झाला आहे. येथील लोकप्रतिनिधींना आपल्या जनतेची काळजी असते, त्यामुळे जनतेच्या हिताची कामे ते करतात. राज्याच्या इतर विभागातील लोकप्रतिनिधींनीही सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे केल्यास राज्याचा सर्वांगीण विकासास हातभार लागेल, असे मत निंबाळकर यांनी मांडले. रामकृष्ण मोरे माझे जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार म्हणजे माझ्या मित्राचा गौरव आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

प्रा. रामकृष्ण मोरे यांचे मोलाचे कार्य
राज्यामध्ये पहिलीपासून इंग्रजी शिक्षणाची सुरुवातही मोरे यांनी केली. त्यामुळेच आज सर्वसामान्यांची मुले इंग्रजी बोलत आणि लिहीत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर आईचे नाव येण्यास तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचे योगदान आहे. रामकृष्ण मोरे यांच्या नावाने देण्यात येणार्‍या पुरस्काराला निंबाळकर पात्र असल्याचे आमदार नीलम गोर्‍हे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनव संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन थोरात यांनी प्रास्ताविक, संजय बालगुडे यांनी सूत्रसंचालन तर मंदार चिकणे यांनी आभार मानले.