भुसावळ : साधारणत: सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीसांबाबत भिती दिसून येते. त्यामुळे नागरिक पोलीसांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे काही आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत गुन्हे दाखल करण्याबाबत धजावत नाहीत. काही घटनांमध्ये तपासकार्यात नारिकांचे सहकार्य लाभून तपासाला देखील गती मिळून खर्या गुन्हेगारांना जेरबंद करणे शक्य होत असते. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी सलोख्याने वागणूक ठेवण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी केले.
यांची होती उपस्थिती
पोलीस स्थापना दिन सप्ताहास सोमवार 2 रोजी पासून सुरुवात करण्यात आली असून येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात डिवायएसपी निलोत्पल यांनी पोलीस कर्मचार्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, ठाकरे, सुरळकर आदी उपस्थित होते.
तक्रारींंची दखल घ्या
यावेळी पुढे बोलताना डिवायएसपी म्हणाले की, शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त राखणे पोलीसांचे आद्य कर्तव्य आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा व गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसविणे हे आपले कार्य मात्र सर्वसामान्य नागरिकच पोलीसांपासून भितीमुळे दूर जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुणी तक्रार घेवून आल्यास त्याची एफआयआर दाखल करुन घेवून तपासाला गती द्यावी नागरिकांशी आपुलकीने वागणूक करावी यामुळे जनमानसात आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही निलोत्पल यांनी सांगितले.
11 ते 4 पेट्रोलिंगच्या सुचना
तसेच शहरात ज्या काही चोरीच्या घटना घडत आहेत. या घटना विशेष करुन रात्री 11 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान होत असतात. त्यामुळे कर्मचार्यांनी रात्री 11 वाजेपासून ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत पेट्रोलिंग करावी, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना केल्या.