सर्वसामान्य माणूस विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो मैल दूर : गायकवाड

0

बारामती । विकासाच्या प्रक्रियेत अज्ञान दूर करून सर्वसामान्य माणूस हा साक्षर झाला पाहिजे. त्याला प्रशासनाचे सर्व कांगोरे समजले पाहिजेत. प्रशासनाच्या चुकीबद्दल लेखी स्वरुपात तक्रार करून जाब विचारण्याची ताकद त्याच्यामध्ये असली पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने सर्वसामान्य माणसाचा विकास होईल. सर्वसामान्य माणूस विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो मैल दूर राहीलेला आहे. अभ्यासपूर्ण ज्ञान मिळाले पाहिजे, असे मत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन व दिपस्तंभ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या शासकीय सेवा, योजना मार्गदर्शन व मदतकेंद्राचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. फाउंडेशनचे सचिव नाना सातव, विष्णुपंत चौधर, किशोर मासाळ, संतोष ढवाण, जयंसिंग देशमुख, अ‍ॅड. जी. बी. गावडे, स्वरूप वाघमोडे, शिवाजीराव कदम, पांडुरंग आटोळे, संतोष मोहिते, जहिर पठाण आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

शासकीय योजना घराघरात पोहचाव्या
शेखर गायकवाड यांनी सामान्य माणसाच्या हक्काविषयीची जाणीव व जागृती याविषयी मार्गदर्शन केले. विविध सेवाभावी संस्था लोकांसाठी कार्यरत आहेतच. पण आता प्रत्येक गावातून पाच-सहा तरुणांनी हे काम हाती घेतले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. दिपस्ंतभाच्या माध्यमातून शासकीय योजना कशाप्रकारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील व त्याचा फायदा सर्वसामान्यांनाच झाला पाहिजे, असे मत के. सी. कारकर यांनी व्यक्त केले.

न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
शासकीय सेवा योजनांची संपूर्ण माहिती देऊन त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कार्यालय सुरू करीत आहोत. ही सर्व सेवा मोफत राहणार आहे. योजनांच्या प्रकरणांचा पाठपुरावा करून 15 दिवसात संबंधितांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सातव यांनी यावेळी सांगितले. सुनिल सस्ते, सुरज पोळ, हनुमंत मोहिते यांनीही मार्गदर्शन केले.