सर्वांगीण विकासासाठी भाजपच

0

भाईंदर । पारदर्शक कारभार करणे हे भाजप सरकारचे अधिकृत धोरण असून मीरा भाईंदर महापालिकेचा कारभार करतानाही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मतदारांना दिली आहे तसेच राज्यात झालेल्या 14 महापालिका निवडणुकांमध्ये 11 महापालिकांत भाजपची सत्ता आली आहे. आणि ज्या ठिकाणी चुकून विरोधकांची सत्ता आली आहे, ते देखील विविध प्रकल्पांच्या मंजुरीसाठी मंत्रालयात आमच्याच मंत्र्यांच्या मागे फिरत आहेत, मग त्याऐवजी मीरा भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी इतर कोणत्याही पक्षाचा पर्याय निवडण्याऐवजी थेट भाजपाच्याच पाठीशी उभे रहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भाजपच मनपाचा दर्जा उंचावणार
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभाराचा शब्द मुंबईकरांना दिला होता. पारदर्शकतेच्या अजेंड्यावर मुख्यमंत्री ठाम राहिल्याने प्रसंगी शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडली होती. विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळूनही भाजपाने पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करता सत्तेबाहेर राहणे पसंत केले. या प्रसंगाची आठवण करून देत मेहता म्हणाले की, मीरा भाईंदर महापालिकेतील कारभार देखील पारदर्शक व्हावा, अशी इथल्या जनतेची अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुणाच्याही मदतीची गरज न लागता, एकहाती सत्ता मिळणे गरजेचे आहे. आमचे उमेदवारही चांगले सुशिक्षित असून निवडून आल्यानंतर भाजपाचे हे नगरसेवक महापालिकेच्या कारभाराचा स्तर निश्चितच उंचावतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्मार्ट शहर बनवणार
भाजपची सत्ता आल्यानंतर मीरा भाईंदर शहरात नेमका काय बदल दिसेल, असे विचारले असता ते म्हणाले की, केंद्रात आमची एकहाती सत्ता असल्याने निर्णय प्रक्रिया आणि त्याच्या अंमलबजावणीत आलेला वेग आपण पाहतोच आहोत. याउलट अनेक पक्षांची एकत्रित सत्ता असल्यास प्रत्येकाचे प्राधान्याचे मुद्दे वेगळे असतात, त्यामुळे प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत गोंधळ उडू शकतो, असे सांगत मेहता म्हणाले की, येत्या काळात मीरा भाईंदरला एक स्मार्ट शहर बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून, भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यास येत्या पाच वर्षांत तुम्हाला बदलेले मीरा भाईंदर शहर नक्कीच दिसेल. कमळ या निवडणुक चिन्हाला मिळालेले एक एक मत विकासासाठीचे वापरले जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.