सर्वांगें साकर अवघी गोड।

0

चंदनाचे हात पाय ही चंदन।
परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥ 1॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार ।
सर्वांगें साकर अवघी गोड ॥ ध्रु.॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून ।
पाहतां अवगुण मिळे चि ना ॥ 2॥
देश आणि प्रदेश पातळीवरील राजकीय आणि इतर घडामोडींच्या धामधुमीत काही घटना या थोड्या दुर्लक्षितच राहिल्यात. गेली साडेसात दशकांच्या जीवनात ज्यांनी अ‍ॅलोपॅथीसारख्या अतिप्रगत चिकित्सा पद्धतीद्वारे तब्बल दीड कोटी रुग्णांना व्याधीमुक्त करण्याचा विश्‍वविक्रम रचला, त्या विदर्भातील थोर मानवहितकारी संत, निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज यांच्या समाधी सोहळ्याकडेही समाजमनाचे असेच दुर्लक्ष झाले. कोणतेही शालेय शिक्षण आणि वैद्यकीय शाखेची पदवी नसतानाही कायम दुष्काळाने होरपळलेल्या बुलडाणा जिल्ह्यासारख्या मागास जिल्ह्यात एक महात्मा व्रतस्थपणे दीन-दलित, पीडित, शोषित आणि वैद्यकीय सेवेपासून वंचित जीवांची सेवा-शुुश्रूषा करतो. त्याचा काहीही गाजावाजा होत नाही, कुठे प्रसिद्धीसाठीची धडपड नाही, तरीही दर शनिवार, रविवारी आणि सोमवारी महाराजांकडे विविध आजारांनी ग्रस्त आणि त्रस्त झालेले हजारो रुग्ण येतात. शारीरिक वेदनांनी पीडित असतानाही तासन्तास रांगेत थांबतात आणि महाराजांचा परिसस्पर्श होताच व्याधीमुक्त होतात, हा आजच्या आधुनिक युगातील चमत्कार होता. वैद्यकीय सेवेच्या कार्याला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू नये म्हणून महाराजश्रींनी आयुर्वेदिक, युनानी किंवा इतर कोणतीही चिकित्सापद्धती स्वीकारली नाही, तर जगभर मान्यता असलेल्या अ‍ॅलोपॅथीसारख्या अतिप्रगत अशा चिकित्सापद्धतीद्वारे वैद्यकीय उपचार केले. खरे तर आज डॉक्टर व्हायचे म्हटले की लाखो रुपये खर्च येतो. चार-साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो, तरीही चिकित्सापद्धतीचे पूर्ण ज्ञान एखाद्याला येईलच असे नाही. त्या तुलनेत कोणत्याही विद्यापीठात न गेलेले, चिकित्सा व शरीरशास्त्राचे कोणतेही अभ्यासक्रम न अभ्यासलेले शुकदास महाराज हे वैद्यकीय क्षेत्रासाठी जिवंतपणीच मोठा चमत्कार आणि आव्हान होते. जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांची रोगनिवारण आणि चिकित्सेची हातोटी पाहिली आणि अक्षरशः तोंडात बोटे घातली. सहा दशकांच्या काळात त्यांनी दीड कोटी रुग्ण तपासले, त्यांना व्याधीमुक्त केले यापैकी एकाही रुग्णाची महाराजांविषयी साधी तक्रारही आली नाही. आज जेव्हा डॉक्टरांच्या उपचारांनी रुग्ण बरा होण्याऐवजी आणखी खालावतो तेव्हा महाराजांची रुग्णसेवा ही निश्‍चितच समाजासाठी कुतूहल, कौतुक आणि दिलासादायक वाटत राहते.

संत तुकारामांनी संतांचे वर्णन फार मार्मिक शब्दांत केले होते. तुकोबा संतांना चंदन, परिस आणि दिव्याची उपमा देतात. चंदन ज्याप्रमाणे सर्वांगाने सुगंधच देण्याचे काम करते, त्याप्रमाणे संतांचे जीवनदेखील सर्वसामान्य जीवांना दुःखमुक्त आणि चंदनाप्रमाणे सुगंधितच करण्याचे काम करत असते. शुकदास महाराज हेदेखील असेच चंदनासम व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे कार्य सर्वांगाने केवळ अन् केवळ समाजहितैशीच राहिले. केवळ वैद्यकीय सेवाच नाही, तर युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी विवेकानंद आश्रम या संस्थेची स्थापना केली. अर्धशतकी वाटचालीत या संस्थेने मानवसेवेचे एकही क्षेत्र सोडले नाही. शैक्षणिक संस्थांचे जाळे विणून विदर्भ-मराठवाड्यातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली केली. आजरोजी केजी ते पीजीपर्यंत हजारो विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. कृषिक्षेत्रातील महाराजांचे संशोधन तर अफलातून होते. त्यांनी शोधलेली गव्हाची नवी जात, पाऊसमानाचा अभ्यास, शेती-शेतकरीबांधवांसाठी उभे केलेले संशोधनात्मक व संस्थात्मक कार्य हे दिलासादायकच नव्हे, तर मोठा आधारवड ठरते आहे. अध्यात्म, वेदान्त आणि विज्ञान, सेवा याद्वारे त्यांनी विवेकानंदांच्या विचारांना कृतीत उतरून कृतिशील समाज घडवणे आणि उपेक्षित घटकांच्या उत्कर्षासाठी चंदनासम झिजण्याचे काम केले. चोवीस तासांतील सहा तास विश्रांतीचे सोडले तर उर्वरित अठरा तास महाराजश्रींना नावीन्याचा आणि सेवेचा ध्यास असायचा. या ध्यासातून त्यांनी समाजासाठी जे कार्य उभे केले ते अलौकिकच आहे. परंतु, त्यांचा देह मात्र चंदनासारखा झिजत राहिला. त्यामुळेच फार मोठे आयुष्य सोडून त्यांना थकलेला देह त्याग करावा वाटला. समाज त्यांचा कायम ऋणी राहील. हे त्यांचे ऋण समाजाकडून कधीही न फिटणारे आहे. 4 एप्रिल 2017 रोजी महाराजांनी वयाच्या 74 वर्षी शरीर सोडले. या दिवशी रामनवमी होती. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर महाराजांनी देहत्याग करून पूर्णाहुती साधली. विदर्भभूमीला संतांची मोठी परंपरा आहे. संत गजानन महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज या संतांनी मानवी जीवनाला प्रबोधन, सन्मार्गाची दिशा आणि सेवेतून पीडित जीवांचा उद्धार असे कार्य उभे केले, ते आभाळाएवढे आहे. या संतांच्या पंगतीतील शेवटचे संत शुकदास महाराज आता समाधिस्थ झाले आहेत. त्यांच्या समाधीस्थळावरून ‘जीव भावे शिव सेवा‘ हा मंत्र घेऊन भविष्यातही हजारोंच्या संख्येने जीव प्रेरित होत राहतील. महाराजांचे हात-पाय चंदनाचे होते, ते ज्या उपेक्षित, पीडित समाजाला स्पर्शित झाले तो समाज, तो जीव सुगंधित होऊन गेला. दैनिक ‘जनशक्ति‘ची
या महापुरुषास विनम्र आदरांजली!