सर्वात उंचावरील रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण

0

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे पुढील आठवड्यापासून जगातील सर्वात उंचावरील रेल्वे मार्गाच्या कामासाठी अंतिम सर्वेक्षणाला सुरुवात करणार आहे. हिमाचल प्रदेशमधील मनालीपासून ते जम्मू-काश्मीरमधील लेहला जोडणारा हा रेल्वे मार्ग असून, 3,300 मीटर उंचीवरून हा मार्ग जाणार आहे. 498 किलोमीटरचा हा मार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात आल्यास भारत चीनला मागे टाकणार आहे. चीनमधील किंघाई-तिबेटपेक्षा मनाली-लेह हा जगातील सर्वात उंचावरील मार्ग ठरणार आहे.

आजपासून सर्वेक्षणाला प्रारंभ
रेल्वे मंत्रालयातर्फे चार रेल्वे मार्गांसाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून, यामध्ये मनाली-लेह मार्गाचा समावेश आहे. 27 जूनला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू या मार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामाचे उद्घाटन करतील. सर्वेक्षणाच्या कामासाठी 157. 77 कोटी खर्च अपेक्षित असून, हा खर्च रेल्वेऐवजी संरक्षण मंत्रालय उचलणार आहे. प्रस्तावित मार्गाला बिलासपूरपासून सुरुवात होईल. सुंदरनगर मंडी, मनाली, टांडी, केलाँग, कोकसार, दारचा, उप्शी, कारू आणि तिथून लेहपर्यंत रेल्वे मार्ग जाणार आहे. फायनल लोकेशनच्या सर्वेक्षणाची जबाबदारी राईट्स या कंपनीला देण्यात आली होती. सर्वेक्षणाचे काम तीन टप्प्यांमध्ये होणार असून, 2019 पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गावर रस्ता असला तरी वर्षातील पाच महिन्यांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असतो. चीनपासून हा मार्ग जवळ असल्याने भारताच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे.