ब्रिटनमधील ‘स्टार्ट अप’ झिपजेटने जगभरातील प्रमुख शहरांमधील तणावपूर्ण जीवनशैलीचे प्रमाण व मानसिक आरोग्याची स्थिती याचा अभ्यास करण्यासाठी 150 शहरांचे सर्वेक्षण केले. जगातील 150 देशांचे सर्वेक्षण करून काढलेल्या निष्कर्षानुसार भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू या महानगरांचा समावेश सर्वाधिक तणावग्रस्त शहरांच्या यादीत करण्यात आला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट हे तणावमुक्त शहरात प्रथम क्रमांकावर असून बगदाद हे सर्वाधिक तणावग्रस्त शहर ठरले आहे. त्यामध्ये नागरिकांमध्ये तणाव निर्माण करणार्या बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता, प्रदूषण, लोकसंख्येची घनता अशा घटकांचा अभ्यास करून त्या शहरांना त्यानुसार गुण देण्यात आले. कमी वेळ सूर्यप्रकाशाची उपलब्धता हेदेखील मानसिक अस्वास्थ्याचे महत्त्वाचे कारण असल्याचे या अभ्यासात दिसून आले. या गुणांकनानुसार स्टुटगार्टपाठोपाठ जर्मनीतील लुक्सेंबोर्ग (2), हॅनोव्हर (3) आणि म्युनिक (5) ही शहरे पहिल्या पाच शहरात आहेत, तर भारतातील शहरांचा यादीच्या तळात समावेश आहे. बंगळुरू (130), कोलकाता (131), मुंबई (138), तर राजधानी दिल्ली 150 पैकी 142 व्या स्थानावर आहे.