नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक ८ फेब्रुवारीला होत असून मतमोजणी ११ फेब्रुवारीला होणार आहे. निवडणुकीपूर्वी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखील आम आदमी पक्षाचे (आप) सरकार सत्तेत येण्यार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ७० जागांपैकी ५४ ते ६० जागांवर आपला विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सर्वेक्षणामधील विरोधाभासही पहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये आजच्या तारखेत निवडणुका झाल्या तर सर्व सातही जागा भाजप जिंकेल असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे केंद्रात दिल्लीकरांचा कौल हा भाजपाच्या तर राज्यात आपच्या बाजूने दिसून येत आहे.
५२ टक्के दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाच्या पारड्यात मत दिले आहे तर ३४ टक्के जनतेने भाजपाला मत दिले आहे. सध्याची परिस्थिती पाहिल्यास भाजपाच्या मतांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता या सर्वेक्षणामधून दिसत आहे. २०१५ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आपला कमी मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१५ साली आपला ५५ टक्के मते मिळाली होती. यंदा हा आकडा ५२ टक्के इतका असेल असा अंदाज आहे. २०१५ ला मिळालेल्या मतांपेक्षा आपला अडीच ते तीन टक्के कमी मते मिळतील तर दुसरीकडे भाजपाला २०१५ च्या तुलनेत यंदा १.७ टक्के अधिक मते मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
७० पैकी आपला ५४ ते ६० जागा मिळतील आणि भाजपाला १०-१४ जागांवर समाधान मानावे लागेल असे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. भाजपाला तीन जागांचा फायदा होणार आहे. तर २०१५ साली ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळणाऱ्या आपचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला दिल्लीत केवळ एखाद्या दोन जागांवर विजय मिळू शकतो असंही या सर्वेक्षणाच्या आकडेवारीमधून दिसते. दिल्लीमध्ये प्रामुख्याने आप विरुद्ध भाजपा अशी दुहेरी लढत असेल असंही या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.