सर्वेश्वराय, महादेवाय नमो नमः

0

भुसावळ । श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना असून या महिन्यात महादेवाची भक्ती केली जाते. त्यामुळे प्रथम श्रावणी सोमवार निमित्त शहरासह परिसरातील महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तसेच हर..हर…महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर निणादून उठले. राणातल्या महादेव मंदिरात पहाटे शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांनी पहिली शिवमूठ म्हणून महादेवाच्या पिंडीवर भक्तीभावाने तांदूळ व बिल्वपत्र अर्पण केले. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची वर्दळ सुरु होती. पूजा करण्यासाठी येणार्‍या भाविकांच्या सुविधेकरीता मंदिराबाहेरच पूजेचे साहित्य विक्री करण्यासाठी काही विक्रेत्यांनी ठेल्यावर आपली दुकाने लावली होती.

रात्री उशिरापर्यंत भाविकांनी केले पूजन
बालाजी गडीवरील शिव मंदिरात पंडित प्रशांत वैष्णव यांच्या हस्ते महादेवाचे पूजन करण्यात आले. तसेच पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात बाहेरुन येणार्‍या भाविकांकडून अभिषेक, पूजन करण्यात आले. सकाळी भक्तीमय वातावरणात परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मंदिरात आरती करण्यात आली. तसेच मंदिरात येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी बजरंग भजनी मंडळाच्या सेवेकर्‍यांनी यावेळी सर्व व्यवस्था राखली.

फराळाचे केले वाटप
पंचायत समिती कार्यालयाशेजारी असलेल्या शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात देखील सकाळपासून भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. परिसरातील भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेऊन विधीवत पूजन केले. व आपल्या सुखी जीवनासाठी महादेवाकडे प्रार्थना करुन साकडे घातले. तसेच पुजर्‍यांच्या हस्ते आरती करण्यात आली. येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रसाद म्हणून केळी व साबुदाणा खिचडी फराळाचे वाटप करण्यात येत होते.

रुद्रपाठ पठण
कंडारी येथील कपिलेश्‍वर महादेव मंदिरावर पहाटे चारला पंडित निलेश कुलकर्णी यांच्याहस्ते मंत्रोच्चारात शिवलिंगाचा विधीवत अभिषेक करण्यात आला. तसेच काही भाविकांनी रुद्रपाठ करुन दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना महादेवाला प्रिय असणारे रुद्राक्षाचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच 6 वाजता महादेवाची आरती करण्यात आली. मंदिराचे महत्व लक्षात घेता परिसरातील दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. मंदिराचे पुजारी काशिनाथ गोसावी यांनी व्यवस्था केली.