सर्वोच्च न्यायालयाची बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटिस

0

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह सी के खन्ना आणि अनिरुद्ध चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लोढा समितीने केलेल्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी अजून का केली नाही असा प्रश्‍न या नोटीशीत सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या क्रिकेट प्रशासकिय समितीने बीसीसीआयमध्ये अजूनही लोढा समितीच्या शिफारशीं लागू करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती धनजंय चंद्रचूड यांच्या तिन सदस्यीय खंडपिठाच्या नजरेस आणून दिले होते. खंडपिठाने त्याची दखल घेत बीसीसीआयच्या प्रभारी सचिवांना कारणे दाखवा नोटीस जारी करत त्यांना 19 सप्टेंबर रोजी न्यायलयात यासंदर्भात बाजू मांडण्यास सांगितले आहे.

यासंदर्भात न्यायमित्राची भूमिका बजावणारे जेष्ठ कायदेतद्य गोपाल सुब्रमण्यम यांनी न्यायलयात सांगितले की, लोढा समितीच्या शिफारशी आणि न्यायालयाच्या आदेशाची अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी बीसीसीआयचे तिन पदाधिकारी सी के खन्ना, अमिताभ चौधरी आणि अनिरुद्ध चौधरी यांची आहे. पण या तिघांनी ती जबाबदारी पार पाडली नाही. खंडपिठाने क्रिकेट प्रशासकिय समितीला, न्यायलयाने याआधी दिलेल्या निर्णयानुसार बीसीसीआयच्या घटनेचा मसुदा तयार करण्याची सूचना केली आहे. त्याआधी बिहार क्रिकेट संघटनेच्या बैठकीसाठी अपात्र पदाधिकार्‍यांना आमंत्रित करून न्यायालयाचा अनादर केल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने चौधरी यांच्यावर ठेवला.