सर्वोच्च न्यायालयात बदली थांबवण्यासाठी बस्सींची धाव ; कॉल डिटेल्स केले सादर

0

नवी दिल्ली : सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधातील लाचखोरीचा तपास करणारे सीबीआय अधिकारी अजयकुमार बस्सी यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारने राकेश अस्थाना आणि सीबीआयचे संचालक आलोक कुमार यांना सुटीवर पाठवण्याबरोबरच अजयकुमार बस्सी यांची पोर्ट ब्लेअरला बदली केली होती. आता बस्सींनी सर्वोच्च न्यायालयात आपली ही बदली थांबवण्यासाठी किंवा त्यात बदल करण्याच्या मागणीसह आरोपींचे कॉल डिटेल्स न्यायालयात सादर केले आहेत. या कॉल डिटेल्समध्ये अस्थाना तो अपना आदमी है, असे आरोपी एकमेकांशी बोलताना म्हणतात. राकेश अस्थाना यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत.

मंगळवारी वकील सुनील फर्नांडिस यांनी सीबीआयचे उपायुक्त अजयकुमार बस्सी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ठेवली. या खंडपीठात न्या. रंजन गोगोई, यू यू लळीत आणि के एम जोसेफ सहभागी झाले होते. याचिकेत अजयकुमार बस्सी यांनी राकेश अस्थानांविरोधात सोमेश प्रसाद आणि मनोज प्रसाद यांच्यावर कट रचणे आणि भ्रष्टाचारासारखे अनेक गंभीर आरोप केले आहेत. प्रसादबंधूंनी राकेश अस्थानांच्या नावावर दोन वेगवेगळ्या वेळेस डिसेंबर २०१७ आणि ऑक्टोबर २०१८ मध्ये लाच मागितली आणि घेतली. यात पहिल्यांदा २.९५ कोटी रुपये तर दुसऱ्यांदा तीन हप्त्यात ३६ लाख रुपये घेतले होते.

अजयकुमार बस्सी यांनी न्यायालयात आणखी एक नोकरशाह रॉचे विशेष सचिव सामंत गोयल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. जेव्हा मी अस्थाना यांच्याविरोधातील आरोपींची चौकशी करत होतो. त्यावेळी टेक्निकल सर्विलंसच्या तपासातून नवीन बाब समोर आली. १६ ऑक्टोबरच्या रात्री मनोज प्रसादला अटक केल्यानंतर सोमेश प्रसादने त्वरीत सामंत गोयल यांना फोन केला होता. त्यानंतर गोयल यांनी अस्थानांना फोन केला होता. बस्सी यांनी आपल्या याचिकेत या फोन कॉल्सचे काही अंशही न्यायालयासमोर सादर केले आहेत.

अजयकुमार बस्सी म्हणाले की, तपासाच्या दरम्यान जमा करण्यात आलेले सर्व पुरावे सीबीआय जवळ असून हे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले जातील. अस्थानाविरोधातील एफआयआरची चौकशी करत असल्यामुळे आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे, असे म्हणत याप्रकरणी एका विशेष तपास पथकाची स्थापना करुन अस्थाना प्रकरणाची निष्पक्षतेने चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.