सर्वोच्च न्यायालयाने ‘एएआय’ला सुनावले

0

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने भारतीय तिरंदाजी संघटनेला (एएआय) एका आठवड्याच्या कालावधीत 2011 च्या राष्ट्रीय क्रीडा नियमावलीनुसार (एनएसडीसी) घटनादुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे घटनादुरुस्ती केल्यानंतर चार आठवड्यांच्या कालावधीत एएआयला कार्यकारिणी निवडणूक घ्यावी लागणार आहे. दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने प्रशासक म्हणून नेमणूक केलेले माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक होईल, असे न्यायाधीश दीपक मिश्रा, ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय तिरंदाजी संघटनेची मान्यता रद्द केली होती. तिरंदाजी संघटनेने सरकारी क्रीडा संहितेच्या वय आणि कालावधी मार्गदर्शकतत्वांचे नियम मोडल्याने तत्काळ प्रभावाने ही कारवाई करण्यात आली होती. तिरंदाजी संघटनेच्या गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत या नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली होती. या निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने सरकारला सरकारी क्रीडा संहितेनुसार निवडणुका होत नाहीत तोपर्यंत तिरंदाजी संघटनेला मान्यता देऊ नये, असे निर्देश दिले होते.