सर्वोच्च शिखर माउंट कांचनगंगावर नागरी मोहिमेचा शुभारंभ

0

पुणे । सहा वर्षांमध्ये 14 पैकी 6 अष्टहजारी शिखरांवरील यशस्वी मोहिमांनंतर ‘गिरिप्रेमी’ आता भारतातील सर्वात उंच शिखर ‘माउंट कांचनगंगा’वर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जाणार आहे. 2019 मध्ये ही मोहीम जाणार असून या मोहिमेचा शुभारंभ येत्या रविवारी (दि.4) सायं साडेपाच वाजता डॉ. कलमाडी शामराव प्रशालेत होणार आहे. यासाठी एडमंड हिलरी यांच्या साथीने माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवलेले शेर्पा तेनझिंग नोर्गे यांचे सुपुत्र, एव्हरेस्टवीर व ज्येष्ठ गिर्यारोहक जामलिंग नोर्गे उपस्थित राहणार आहेत.

2019 च्या एप्रिल-मे महिन्यामध्ये ही मोहीम जाणार असून या मोहिमेचा भाग म्हणून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शुभारंभ कार्यक्रमात मोहिमेच्या लोगोचे अनावरण, वेबसाईटचे उद्घाटन व इतर अनेक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात जामलिंग नोर्गे त्यांचे गिर्यारोहणाचे अनुभव सांगणार असून आपल्या वडिलांच्या गिर्यारोहणाच्या देदिप्यमान कामगिरीवर देखील प्रकाश टाकणार आहेत.

हिमनद्यांची स्वच्छता करणार
‘गिरिप्रेमी’तर्फे ‘माउंट कांचनगंगा इको एक्स्पेडीशन 2019’ ही पर्यावरणपूर्वक मोहीम असून ‘स्वच्छ पर्वत, स्वच्छ हिमनदी’ या ध्येयांतर्गत ‘माउंट कांचनगंगा मोहिमे’च्यावेळी कचर्‍याची साफसफाई करणार आहे. शिखराच्या परिसरामध्ये तब्बल 120 हिमनद्या असून या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतावर खूप मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यामुळे या हिमनद्यांची स्वच्छता हा महत्वाचा भाग असणार आहे. याविषयी वर्षभर जनजागृती कार्यक्रम होणार आहेत. कांचनगंगा परिसरातील जैवविविधतेचा अभ्यासदेखील मोहिमेतील गिर्यारोहक करणार असून त्यासंदर्भातील टिपणे ते नोंदवणार आहेत. नेपाळ व भारताच्या अशा दोन्ही बाजूच्या बेसकॅम्पपर्यंत ट्रेक्स आयोजित करून अधिकाधिक लोकांना या ‘इको’ मोहिमेचा भाग बनविण्याचे ध्येय ‘गिरिप्रेमी’ने ठेवले आहे.