सर्वोच्च सभागृहात काय चाललंय?

0

काल रात्री उशिरा विधानसभेत गंभीर प्रकार घडला. विधानसभेचे कामकाज अध्यक्षांनी संपले असल्याचे घोषित केले मात्र संसदीयकार्य मंत्री आले आणि सभागृह पुन्हा सुरू करण्यात आले. एक बिल पास कराण्याचे काम सभागृहात सुरू होते. बिल पास करत असताना प्रत्येक सदस्यांना त्यावर बोलायचे होते. काही सदस्यांना काल बोलू दिले जात नव्हते. यावेळी भावनेच्या भरात आमदार बच्चू कडू यांनी राजदंडच उचलला. हि घटना खरतर ऐतिहासिक म्हणावी लागेल. सभागृह स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर मंत्र्यांच्या विनंतीने बिलाचे काम सुरु झाले.

खरतर आता अधिवेशन शेवटाकडे जात असताना सभागृहाचे कामकाज अतिशय वेगाने उरकले जात आहे. मात्र हे उरकताना नियमांची पायमल्ली तर होत नाही ना? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शेवटाकडे जात असल्याने सरकारने उगाच घाई करणे चुकीचे आहे. सभागृहात सदस्यांना बिलावर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. सरकारने कारभार रेटून नेऊ नये. सभागृहाचे कामकाज गांभीर्याने सुरू नाही. विरोधी पक्षांचे आणि सत्ताधारी पक्षांचे २९३ चे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहेत. अनुदान मागणीवर सदस्य बोलतात तेव्हा कॅबिनेट मंत्री उपस्थित नसतात. अजित पवार यांनी सरकारमधील लोकच गंभीरनसल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे. सदस्य बोलत असताना कॅबिनेट मंत्री बसवावेत, अशी मागणी केली.

विधानसभेच्या कामकाजात मंत्र्यांना गांभीर्य राहिले नसल्याची बोचरी टीका विरोधकांनी केली. ही टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलीच लागली आहे. सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मंत्र्यांना सक्त ताकीद देण्यात येईल असे सांगितलेले असतानाही विरोधकांनी पुन्हा-पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करत असल्यामुळे मुखमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. एकाच विषयावर किती वेळ वाया घालवणार आहात, मंत्र्यांना ताकीद देण्यात येईल, असे सांगितलेले असतानाही हाच प्रश्न विचारला जात असल्यामुळे विरोधकांना विधानसभेतील कामकाजाचे गांभीर्य किती आहे हे स्पष्ट होते, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावले. सभागृहाच्या काही प्रथा, परंपरा आहेत. त्यानुसार चालत असताना सरकारसोबत विरोधकांनीदेखील कामकाजाच्या बाबतीत गंभीर राहणे आवश्यक आहे. विरोधी पक्षातील आमदार हे प्रश्न विचारतात तेंव्हा मंत्री उपस्थित नसतात अगदी तसेच मंत्री उत्तर देत असताना आमदार उपस्थित नसतात, हे देखील खरे आहे. यावर जे आमदार सभागृहात उपस्थित राहतील त्यांच्याच प्रश्नाला उत्तरे दिली जातील, असा तोडगा मुख्यमंत्र्यांनी काढलाय. सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडवले जातात परंतु जनतेचे प्रश्न मांडले जात असताना त्याचे उत्तर देण्यासाठी कॅबिनेटमंत्री सभागृहामध्ये हजर नसणे आणि मंत्री उत्तर देताना आमदार उपस्थित नसणे हे देखील सामान्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मात्र दोन्ही गटाकडून याला हरताळ फासला जातोय हे मात्र नक्की.

– निलेश झालटे