सर्वोदय नगरवासीयांसाठी म्हाडाची खास लॉटरी

0

मुंबई । गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या सर्वोदय नगरमधील रहिवाशांचे हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या घेतलेल्या बैठकीनंतर फेबुवारी 2018 पर्यंत पूर्ण होणार आहे. येत्या 15 दिवसांमध्ये येथील रहिवाशांची लॉटरी काढण्याचे निर्देश वायकर यांनी म्हाडाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. मजासवाडी सर्वोदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेच्या पुनर्विकासाचे काम जे. पी इन्फ्रा यांच्यामार्फत सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेतील 171 कुटुंबे आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहे. रहिवाशांना डिसेंबर 2017 पर्यंत विकासकाकडून घरांचा ताबा देण्यात येणार होता. मात्र, काही कारणांमुळे विकासकाला घरांचा ताबा देणे शक्य झाले नाही. घरे तयार होऊनही विकासकाकडून ताबा मिळत नसल्याने येथील रहिवाशांनी राज्यमंत्री वायकर यांच्याकडे धाव घेत विकासकासमवेत बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार राज्यमंत्री वायकर यांनी सोमवारी घरकुलाची पहाणी व बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष लाखे, म्हाडाचे एक्झ्युकिटिव्ह इंजिनीअर एन. एन. चिंतामणी, जे. पी. इन्फ्राचे विकासक, सर्वोदयनगरचे पदाधिकारी, उपविभागप्रमुख विश्‍वनाथ सावंत आदी अधिकारी उपस्थित होते. मुख्य अग्निशमन अधिकारी यांची अद्याप परवानगी मिळणे बाकी असून तसेच काही कारणांमुळे नाल्याचे काम पूर्ण होणे बाकी असल्याने महापालिकेकडून ताबा प्रमाणपत्र मिळणे बाकी असल्याची माहिती विकासकाने राज्यमंत्री वायकर यांना दिली. येत्या आठ दिवसांमध्ये या दोन्ही अडचणी दूर करण्याच्या सूचना वायकर यांनी म्हाडाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

पुनर्विकासासाठी विकासकासोबत करार
या नगराचा पुनर्विकास करताना पहिली 171 जण ज्यांनी विकासकाबरोबर करार केला त्यांची प्रथम लॉटरी काढण्यात यावी, अशी सूचना विकासकाने यावेळी केली. त्यानुसार सध्या सर्वोदयनगर येथील अ, ब, क या इमारतींचे काम जवळ जवळ पूर्ण होत असल्याने या तिन्ही रहिवाशांची 15 दिवसांमध्ये लॉटरी काढण्यात यावी, जेणे करुन एकदा का रहिवाशांना खोली नंबर मिळाल्यास रहिवासी आपल्या खोलीमध्ये अन्य कामांस सुरुवात करू शकतील. त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत फेबु्वारी 2018 पर्यंत या सर्वांना हक्काच्या घरात स्थलांतरित करावे, असे निर्देश राज्यमंत्री वायकर यांनी म्हाडाचे अधिकारी तसेच विकासकाला दिले.