धुळे । येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालय तात्काळ सुरु करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अस्तित्वात असणार्या जुन्या इमारतीचे सरंचना लेखापरिक्षणानुसार 2 कोटी 63 लाख 84 हजार रुपये मंजूर करुन रुग्णालय अद्यावत करुन ताब्यात घेवून लवकरात लवकर सुरु करा, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्याचे सार्वजनिक आराग्यमंत्री डॉ.दीपकसावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग व संचालक सार्वजनिक आरोग्य यांना माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी मुंबई येथे नुकतीच भेट घेवून दिले आहे. दरम्यान, या संदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे सप्टेंबर 2017 च्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याबाबत मंत्रालयात हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिली आहे.
रूग्णांना सोसावा लागतो आर्थिक भुर्दंड
मागील दोन वर्षापासून धुळ्याचे सर्वोपचार रुग्णालय धुळ्यापासून 6 कि.मी. अंतरावरील चक्करबर्डी येथे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित केल्याने धुळ्यातील गोरगरीब रुग्ण व ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत असल्याचे याभेटीत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. शासकीय सर्वोपचार रुग्णालय गेल्या 16 मार्च 2016 पासून धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. हे रुग्णालय धुळ्याच्या मध्यवर्ती ठिकाणापासून 6 कि.मी. लांब अंतरावर गेल्यामुळे धुळेकर जनतेला या लांबच्या अंतरामुळे वैद्यकीयसेवा घेण्यासाठी आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. शासकीय रुग्णालयात नाममात्र शुल्कावर उपचार होत असतात. मात्र आता हे उपचार घेण्यासाठी प्रवासाचा रुग्णांना रात्री-अपरात्री चढ्यादराने रिक्षा किंवा खासगी वाहन घेवून जाणे परवडत नाही. यामुळे धुळेकर जनता शासकीय वैद्यकीय उपचारांना मुकत आहे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. गोरगरीब रूग्णांना खासगी रूग्णालयात उपाचार घेणे परवडत नसतांना त्यांना सर्वोपचार रूग्णालयाचा आधार होता. परंतु हे रूग्णालय स्थलांतरीत केल्याने त्यांचे हाल होत आहेत. रूग्णालय बंद होवून दोन वर्ष लोटल्यानंतरही येथे बृहत आराखड्यानुसार 100 खाटांचे महिला व 100 खाटांचे नवजात शिशू रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेवूनही त्यावर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
बृहत आराखड्यास शासनमान्यता
शासकीय सर्वोपचार रुग्णालय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे स्थलांतरीत करत असताना जुने सर्वोपचार रुग्णालय कार्यरत ठेवण्यासाठी सन 2012-13 च्या बृहतआराखड्यात 100 खाटांचे महिला व 100 खाटांचे नवजात शिशू रुग्णालय सुरु ठेवण्यात यावे, अशा प्रकारचा शासनास्तरावर निर्णय झालेला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी 4 वर्षे उलटले तरी प्रशासनाने केलेली नाही. धुळ्याच्या 200 खाटांच्या रुग्णालयासाठी 307 पदे मंजूर करुन त्यास आता मान्यता मिळाली असल्याचेही माजी आमदार पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
विविध दुरूस्ती कामांना येणारा खर्च
जिल्हा रुग्णालय,धुळे येथील सर्जिकल विभागांची 62,45,702(62 खाटा) दुरुस्ती करणे.
जिल्हा रुग्णालय,धुळे येथील बाह्यरुग्ण विभागांची 35,50,333 दुरुस्ती करणे.
जिल्हा रुग्णालय,धुळे येथील अपघात विभागांची 29,31,334 दुरुस्ती करणे.
जिल्हा रुग्णालय,धुळे येथील आयसोलेशन विभागांची 14,15,698 दुरुस्ती करणे.
जिल्हा रुग्णालय,धुळे येथील प्रसुतिगृह विभागांची 12,04,675 दुरुस्ती करणे.
जिल्हा रुग्णालय,धुळे येथील संरक्षक भिंतीची 04,66,800 दुरुस्ती करणे.
जिल्हा रुग्णालय,धुळे येथील प्रसाधनगृहाची दुरुस्ती करणे. 09,36,826
जिल्हा रुग्णालय,धुळे येथील स्वयंपाकगृहाची दुरुस्ती करणे. 10,32,948
बांधकामा दुरुस्तीसाठी लागणारा एकूण खर्च रुपये 1,77,84,316
अधिक पूर्ण आवारातील विद्युत यंत्रणेचे पुर्नजीवनसाठी लागणारा खर्च 87,000,00
अपेक्षित निधी रुपये 2,64,84,316
रूग्णालय परिसरात अवैध धंदे
रुग्णालय स्थलांतरीत झाल्यामुळे बेवारस अवस्थेतील जुन्या सर्वोपचार रुग्णालयाची अतोनात हानी झाली आहे. या रूग्णालयाची दारे, खिडक्या, पंखे, विदयुत फिटींग चोरीला गेली आहे. हा परिसर अवैध धंदे व व्यसनी लोकांचा अड्डा बनला आहे. दोन वर्षांपासून वापरात नसल्यामुळे जुन्या इमारतीचे संरचना लेखापरिक्षण करुन शासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाने व विदयुत विभागाने दुरुस्ती खर्चाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार 2 कोटी 64 लाख 84 हजार 316 रुपये दुरुस्तीसाठी आवश्यक आहेत. सदर र क्कम मिळाल्यानंतरच रुग्णालयाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल व इमारतीचा भौतिक परिपुर्णतेचा अहवाल सादर केल्यानंतर रुग्णालय सुरु करता येणे शक्य आहे.