सर्व्हिस रोडसाठी भुसावळात महामार्ग रोखला

दहा आंदोलकांना शहर पोलिसांनी घेतले ताब्यात : नंतर केली आंदोलकांची सुटका

भुसावळ : सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी 11 वाजता शहरातील अयोध्यानगरासह मोहितनगर, जळगावरोड परीसरातील रहिवाशांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अचानक रस्ता रोको आंदोलन केल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली तर दूरपर्यंत वाहनधारकांच्या रांगा लागल्या. प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता झालेल्या आंदोलनानंतर भुसावळ शहरचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्‍यांनी आंदोलनस्थळी धाव घेत दहा आंदोलकांना ताब्यात घेत अन्य आंदोलकांना पांगवले तर नंतर ताब्यात घेतलेल्यांची काही वेळेनंतर सुटका करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनाकडे या आंदोलनाकडे महामार्ग प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकार्‍यांनीही पाठ फिरवल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

सर्व्हिस रोडअभावी अडचणी वाढल्या
महामार्गावरील नवोदय विद्यालयासमोरील कोणार्क हॉस्पीटल ते आयोध्यानगरच्या बोगद्यासमोरुन पूर्वेकडील रेल्वेलाईन पुलापर्यंत जाणार्‍या बोगद्याच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोडचे काम महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केले नसल्याने स्थानिक प्लॉट धारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींपासून महामार्ग प्राधिकरणापर्यंत पाठपुरावा केल्याने प्रश्न सुटलेला नाही. मंगळवारी सकाळी 11 वाजता अचानक संतप्त नागरीकांनी महामार्गावर रास्तारोको केल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प् झाली.

10 आंदोलकांना घेतले ताब्यात
आंदोलनाची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राहुल गायकवाड व कर्मचार्‍यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. हे आंदोलन बेकायदेशिर व परवानगी विना होत असल्याने 10 आंदोलनाकांना मुंबई पोलिस अ‍ॅक्ट 68 व 69 नुसार ताब्यात घेण्यात आले व काही वेळेनंतर त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक दीपक धांडे, माजी स्विकृत नगरसेवक चंद्रशेख्रर अत्तरदे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सामाजिक कार्यकर्ते सतीष सपकाळे आदींसह परीसरातील नागरिक उपस्थित होते.

या आंदोलकांना अटक व सुटका
महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन प्रकरणी शहर पोलिसांनी प्रवीण महाजन (पद्मालय नगर), कुंदन पाटील (जुना सतारे), सेवक कोळी (हूडको कॉलनी), स्वप्नील सावळे (मोहित नगर), लव झाडगे, नीलेश चौधरी, भीमराव पाटील, अलका भगत, संगीता चौधरी, मंगला पाटील (सर्व राहणार अयोध्यानगर) अशा दहा जणांना कलम 68 व 69 प्रमाणे ताब्यात घेण्यात आले व नंतर त्यांची सुटका करण्यात आली.