सर्व्हे: शिवसेनेला वगळून, 48 टक्के मतदारांना वाटते भाजपची सत्ता येईल !

0

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी केवळ काही तासच शिल्लक राहिले आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला जोर लावला आहे. याच पार्श्वभूमीवर एका सर्वेक्षणातून राज्यात भाजपाची सत्ता येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तब्बल ४८.८ टक्के मतदारांना भाजपाचीच सत्ता येईल, असे मत व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे मतदारांना सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता अतिशय धूसर वाटते. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने हे सर्वेक्षण केले आहे.

भाजपाला जवळपास निम्म्या मतदारांनी कौल दिलेला असताना शिवसेनेला केवळ ९ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. काँग्रेसची सत्ता येईल, असे फक्त १०.६ टक्के मतदारांना वाटत आहे. राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते, अशी शक्यता ११.३ टक्क्यांनी व्यक्त केली आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या व्यतिरिक्त इतरांची सत्ता येईल, असा अंदाज ११.३ टक्क्यांनी व्यक्त केला आहे. तर ८.९ टक्के मतदारांनी सांगता येत नाही, असं म्हणत यावर बोलण्यास नकार दिला आहे.