भाजपामध्येच शेवटपर्यंत कार्यरत राहणार : दिशाभूल करण्यासाठी विरोधकांकडून खेळी
पिंपरी-चिंचवड : मी यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. भाजपामध्येच राहून भाजपासाठीच शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहे. माझ्या या पुढच्या सर्व निवडणुकाही मी भाजपातर्फेच लढणार आहे. त्यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी ग्वाही भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
‘प्राब’चा अंदाज जगताप राष्ट्रवादीत
मावळ लोकसभा मतदारसंघातून आमदार जगताप आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे अशी थेट लढत निश्चित असल्याचे दोन वर्षांपासून मानले जात आहे. युती होणार नाही असा अंदाज बांधून हे गृहितक मांडले जात होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरून युती होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही जागा विद्यमान खासदार म्हणून शिवसेनेकडेच राहिल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवून पारंपरिक विरोधक बारणे यांचा पराभव करायचाच असा पण केलेले जगताप भाजपला राम राम ठोकून बाहेर पडतील. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवतील, असा अंदाज पुणे येथील पॉलिटिकल रिसर्च अँण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेने वर्तविलेला आहे. हा अंदाज संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी झाल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. तसेच चर्चांना ऊत आला आहे.
चुकीच्या सर्व्हेचा आधार
या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जगताप यांनी म्हटले आहे, की पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही हद्दपार झाले आहेत. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थतेतूनच माझ्या विरोधात अशा अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. माझ्या विरोधकांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी अशा काही चुकीच्या सर्व्हेंचा आधार घेतला आहे. चुकीचा प्रचार आणि प्रसार करणे त्यांचा नित्याचाच ‘उद्योग’ आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही विरोधकांची ही खेळी माहीत झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्याच जोरावर भाजपाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. सर्वसामान्यांपर्यंत भाजपाला पोहचविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मी भाजपामध्ये शेवटपर्यंत राहणार असून यापुढच्याही सर्व निवडणुका भाजपातर्फेच लढविणार आहे.
भेगडे, लांडगेही मंत्रीपदाचे दावेदार
जगताप यांनी खुलासा केला असला तरी मावळमधून लढण्याचा मनोदय त्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. या मतदारसंघात पिंपरी-चिंचवड, पनवेल या महापालिका व वडगाव मावळ, लोणावळा नगरपरिषदा भाजपाच्या ताब्यात आहेत. तरीही शिवसेनेकडे असलेल्या जागेवर भाजपचा दावा युती होण्याच्या दृष्टीकोनातून टिकणारा नाही. त्यामुळे जगताप यांना आपली इच्छा सोडून द्यावी लागेल. ते गेली 14 वर्षे आमदार असून मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत. मात्र, भाजपमधील त्यांची पहिलीच टर्म आहे. या मतदारसंघातील मावळ विधानसभेचे आमदार बाळा भेगडे सलग तीन वेळा विजयी झाले आहे. त्यामुळे ते देखील मंत्रीपदाचे दावेदार आहेत. तसेच भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला असून मुख्यमंत्र्यांंच्या जवळचे मानले जातात. तसेच पालिकेतील सलग दोनवेळा महापौरपदी समर्थकांची निवड करून वर्चस्व सिद्ध केलेले आहेत. त्यामुळे महामंडळ अथवा मंत्रिपदाचे तेही दावेदार आहेत.
मग खासदारकीची इच्छापूर्ती होणार कशी?
जाणकारांच्या मते जगताप यांना त्यांच्या समर्थकांना पालिकेतील प्रमुखपदी, महापौरपदी नियुक्ती करता आलेले नाही. मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील निवड प्रक्रियेतील काही निकष, पात्रतेत त्यांचा समावेश होत नाही. महापालिका विजयात वाटा असणार्या आझम पानसरे यांच्यावर भाजपमध्येही अन्याय होतो आहे. त्यांना चांगल्या पदाची आशा आहेत. पानसरे भाजपामध्ये सामावून घेण्यात जगताप यांची महत्वाची भूमिका असली तरी त्यांनाही काहीही देता आले नाही याचे देखील शल्य जगतापांना आहेच. अशा सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन केल्यास जागा वाटपात भाजपला मावळ लोकसभा मिळाला नाही, तर खासदारकी लढविण्याची इच्छापूर्ती त्यांना करता येणार नाही, लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार सोडून द्यावा लागेल. महापालिकेतील एक हाती सत्ता केंद्र नाहीं, या सर्व राजकीय सद्यस्थितीचाही विचार होणे आवश्यक आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तूळात आहे.