मानव अधिकार संघटनेची बँकेकडे मागणी
मुरुड – नोटबंदीच्या काळापासून मुरुड शहरात तसेच तालुक्याच्या अन्य भागात जिथे एटीएम अस्तित्वात आहेत अश्या ठिकाणी बँकेच्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी गेले असता शंभर रुपयांच्या नोटा न मिळता त्या पाचशे व दोन हजाराच्या नोटा मिळत असल्याने याच नोटा पुन्हा इतर बँकेत जाऊन सुट्टे आणण्याचा त्रास वाढला आहे. अशा असंख्य तक्रारी बँक ग्राहकडून मानवाधिकार संघटनेस प्राप्त झाल्याने मानव अधिकार संघटनेकडून सर्व बँक शाखांव्यवस्थपकास लेखी अर्ज सादर करून एटीएममधून शंभर रुपयांच्या नोटा सुद्धा मिळाव्यात अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बँक ऑफ इंडियास सूचना देताच तेथील शाखा व्यवस्थपकाने आम्ही शंभर रुपयांच्या नोटा सुरु केल्याचे सांगितले. बँक ऑफ इंडिया प्रमाणे दोन्ही बँकांनी सुद्धा शंभर रुपयांच्या नोटांचा भरणा करून ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी फकजींनी केली. यातील काही बँकांनी फकजी याना सांगितले, रिजर्व बँक ऑफ इंडियाकडून आम्हाला शंभर रुपयांच्या नोटांचा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. अश्या बँकांची तक्रार आपण रिझर्व बँकेकडे करणार असल्याचेही फकजी ंनी सांगितले.
नागरिकांना त्रास
याबाबत अधिक माहिती देताना मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी म्हणाले कि, केंद्र सरकार सध्या कॅशलेस व्यवहारावर अधिक भर देत आहे. त्यामुळे मुरुड तालुक्यातील असंख्य बँक ग्राहकांनी एटीएम कार्ड घेतले आहे. गरजेनुसार माणूस एटीएममधून पैसे काढत असतो परंतु सर्व बँकांच्या एटीएम मधून फक्त पाचशे व दोन हजार रुपयांचा भरणा केल्यामुळे चारशे किंवा तीनशे रुपये काढावयाचे असतील तर जबरदस्ती पाचशे रुपयेच काढावे लागतात. तसेच मोठ्या रकमेच्या नोटा काढल्यामुळे इतर बँकेत जाऊन किंवा अन्य दुकानातून सदरचे पैसे सुट्टे करण्यासाठी दारोदार फिरावे लागते. हा फुकटचा त्रास सद्या मुरुड तालुक्यातील असंख्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे.