बीडमध्ये 66 घरे उभारणार; राज्यात होतोय पहिलाच प्रयोग!
मुंबई (निलेश झालटे): एकीकडे समाजात काही असामाजिक तत्वे दोन समाजांमध्ये तेढ लावण्यात मश्गुल असताना दुसरीकडे बीडमध्ये मात्र सामाजिक एकतेचा अनोखा संदेश दिला जात आहे. गावाकुसात, खेडोपाड्यात जाती, धर्माच्या वेगवेगळ्या वस्त्या वाड्या असतात. मात्र राज्यात आता असा एक उपक्रम उभा राहत आहे की जेथे सर्व जाती धर्माचे लोक एका छताखाली नांदणार आहेत. यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात हिवरा खुर्द गावात 66 घरांचा उपक्रम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 66 पैकी 62 घरांसाठी 30 हजार रुपयांचा पहिला हप्ताही देण्यात आला आहे.
जाती पातीच्या भिंतींच्या पलीकडे एक माणूस जात धर्म उभा राहावा, यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न केले जात आहेत. पण त्याला अपेक्षित स्वरूप येताना दिसत नाही. हे चित्र बदलावे यासाठी पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकासने पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. आर्थिकरित्या दुर्बल घटकांअंतर्गत घरे मिळतील, पण जाती पातींच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणार असाल तर एकाच ठिकाणी 66 घरे लगेच उपलब्ध होऊ शकतील, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. विशेष म्हणजे या प्रस्तावाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि हिरवे खुर्द ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर ही घरे आता उभी राहत आहेत.
या घरांसाठी प्रत्येकी 5 हप्त्यात 1 लाख , 20 पैसे दिले जाणार आहेत. तर मजुरीच्या स्वरूपात मनरेगांतर्गत 18 हजार दिले जातील. याशिवाय स्वच्छ भारत अभियानासाठी शौचालय बांधण्यासाठी 12 हजार मिळतील. अशी एकूण दीड लाखांची रक्कम घर उभे करण्यासाठी मिळेल. विशेष म्हणजे सर्व घरे ही एका आकाराची असणार आहेत. यामुळे बाहेरूनही हे घर एका विशिष्ट जाती धर्माचे आहे, हे कळणार नाही. एकत्र राहणाऱ्या माणसांची मनेही एकाच आकाराची राहतील, हा यामागचा उद्देश असेल. राज्यातील उपलब्ध जागांचा विचार करता भविष्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन माळ्यांची घरे उभारण्याचा विचार केला जात आहे, अशीही माहिती ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सर्व जाती धर्माचे लोक या उपक्रमामुळे एकत्र नांदतील, असा आम्हाला विश्वास वाटतो. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून पुढे त्याचा विस्तार करण्यात येईल
– पंकजा मुंडे ,
ग्रामविकासमंत्री