सर्व धर्मीय बालगोपाळांनी साकारल्या गणेशमूर्ती

0

हडपसर । शाडू मातीला सर्व धर्मीय बालगोपाळांनी ‘श्री गणेशाचा’ आकार देऊन सुंदर व सुबक मूर्ती बनविल्या. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना पाहून त्यांच्या पालकांनी कौतुकाने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. निमित्त होते; हडपसर येथील सिद्धेश्‍वर व शिवसमर्थ बहुउद्देशीय संस्था यांनी आयोजित केलेल्या शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा याचे प्रबोधन करणे व मुलांच्या कलागुणांना वाव देणे या उद्देशाने महात्मा फुले वसाहत येथील शिवसमर्थ अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हडपसर येथील हरिश पैठणकर यांनी प्रशिक्षण दिले.

जयप्रकाश वाघमारे, दिगंबर माने, हडपसर साहीत्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सुधीर मेथेकर यांनी ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. मनिषा वाघमारे, आरती जगताप, डॉ. शंतनु जगदाळे यांनी हा उपक्रम आयोजित केला होता.