सर्व महाविद्यालयात स्पर्धा – परीक्षा मार्गदर्शन केंद्र व प्लेसमेंट सेल सुरू करावेत
सिनेट सदस्य अमोल मराठे यांची निवेदनाद्वारे मागणी.
शिंदखेडा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात व विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व प्लेसमेंट सुरू करण्यात यावेत अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्या वतीने सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे केली. सद्यस्थितीत महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असून स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, या क्षेत्रातील विविध परीक्षांच्या संधी, परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम इ. बाबतीत विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे यासाठी सर्व महाविद्यालयात विद्यापीठ संचलित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यापीठाने सुरू करावेत, विद्यापीठाने या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात मासिके, संदर्भग्रंथ, अभ्यासासाठी आवश्यक ती सर्व पुस्तके, इ. उपलब्ध करून द्यावीत. तसेच वर्षभरात विविध तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने, वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासमंडळे, मुलाखती, स्पर्धा परीक्षांचा सराव म्हणून सराव परीक्षा इ. उपक्रम महाविद्यालयात राबाबविण्यात यावेत, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहराच्या ठिकाणी जाऊन आर्थिक भार उचलून खाजगी क्लासेस लावण्याची आवश्यकता भासणार नाही आणि अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतील.
त्याचबरोबरीने विद्यापीठ कॅम्पस आणि सर्व महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल उभारून कार्यान्वित करावा. त्याद्वारे करियर गायडन्स, स्किल डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखतीची तयारी कशी करावी, मुलाखतीचे प्रात्यक्षिके, कॅम्पस इंटरव्ह्यू, इत्यादी उपक्रम राबविण्यात यावे आणि अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांना सर्व महाविद्यालयात निमंत्रित करण्यात यावे.
सर्व महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यान्वीत करून उत्कृष्ठ पद्धतीने त्याचे संचलन होण्यासाठी विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने अथवा महाविद्यालय स्तरावर जेष्ठ प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येवून हा उपक्रम सर्व महाविद्यालयात यशस्वीरीत्या राबविण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी कुलसचिव डॉ.आर.एल.शिंदे यांची भेट घेऊन दिले. यावेळी सिनेट सदस्य नितीन ठाकूर उपस्थित होते.