अयोध्या: अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला १५० निमंत्रितांसह एकूण २०० जण हजर राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले जाणार की नाही? याबाबत चर्चा सुरु होती. मात्र सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलविण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या वारसांना या कार्यक्रमाला बोलविण्यात यावे अशी मागणी होत होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती दिली होती.