व्यवसायांना सरसकट दुपारी १ वाजेपर्यंत परवानगी द्यावी अन्यथा आमरण उपोषण
हिंदु सेवा सहाय्य समितीचा इशारा
नंदुरबार- हातावर पोट असलेले गोरगरीब जनता आणि सामान्य व्यावसायिक यांचे प्रचंड हाल होत असून सर्वच व्यवसायांना सरसकट दुपारी १ वाजेपर्यंत परवानगी द्यावी अन्यथा ४ एप्रिलपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा हिंदु सेवा सहाय्य समितीने दिला आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, नंदुरबारचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनावर धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, कपिल चौधरी, पंकज डाबी आदींचा स्वाक्षरी आहेत.
निवेदनात पुढे म्हटले की, नंदुरबार जिल्हा प्रशासनाने आदेशानुसार दि. १ ते १५ एप्रिल पर्यंत नंदुरबार जिल्ह्यात लोकडाऊन जाहीर केले आहे. सुरुवातीला फक्त अत्यावश्यक सेवा वैद्यकीय सेवा, किराणा, भाजीपाला यांनाच सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास सूट दिली होती. अन्य छोटे व्यापारी आणि हातावर पोट भरणारे यांच्यासाठी हिंदु सेवा सहाय्य समिती आणि व्यापारी महासंघ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सरसकट सर्व व्यवसाय यांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्याची मागणी केली असता जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत काही ठराविक आस्थापने सुरू ठेवण्याचे सुधारीत आदेश काढले आहेत. आपल्या आदिवासी जिल्ह्यात रोजगाराचे अन्य साधन नसल्याने सर्वांचा उदरनिर्वाह हा रोजंदारी काम करून होत असतो.जिल्हा प्रशासनाने काही विशिष्ट प्रतिष्ठाने उघडून बाकीची प्रतिष्ठाने बंद या आदेशामुळे अनेकांचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. महाराष्ट्रतील धुळे, संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर, बीड येथे घोषित पूर्ण लॉकडाऊन नंतर रद्द करण्यात आले आहेत. त्याच धरतीवर आपल्या ही जिल्ह्यात सर्व प्रतिष्ठाने, व्यवसाय यांना दुपारी १ वाजेपर्यंत सरसकट मुभा द्यावी, ३ एप्रिलपर्यंत प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास ४ एप्रिल पासून मागणी मान्य होईपर्यंत हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील आमरण उपोषण करतील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे