जळगाव : देशात बँकिंग व्यवहार वाढले पाहिजेत. पैसा, सोने आदींचा व्यवहार जर डिजीटल झाला तर नक्कीच निकोप व सक्षम अर्थव्यवस्था देशात निर्माण होईल. यामुळे देश आर्थिक महासत्ता होण्यास काही वेळ लागणार नाही. नोटाबंदीमुळे देशात मोठ्या प्रमाणात फायदा झाला, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ व अर्थक्रांती प्रतिष्ठानचे संचालक यमाजी मालकर यांनी केले. बांभोरी येथील श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फिस्ट’ व्याख्यानमाले्त दुसर्या दिवशी ते ‘नोटाबंदी नंतरचा भारत’ या विषयी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतीय समाज हा 1960 पर्यंत नोटा हातात घ्यायला कचरत होता, तो समाज 8 नोव्हेंबर 2016 रोजी हातातून काढायला तयार नव्हता. भारतात 86 टक्के नोटा ह्या मोठ्या रकमेच्या नोटा होत्या. सुट्या पैशाचा तुटवडा नोटाबंदी नंतर निर्माण झाला.
नोटाबंदीनंतर सीमेवरील पैशांची तस्करी रोखली गेली. हवालातर्फे जाणार्या नोटा कमी झाल्या. नोटाबंदी हे ऑपरेशन आहे, त्यामुळे ‘करन्सी’चे शुद्धीकरण झाले. आर्थिक व्यवहाराची डिजीटल पद्धती भारतीयांनी स्वीकारली, असेही मालकर यांनी विश्लेषण केले. व्याख्यानमाले्त दिवसातील दुसरे वक्ते भारतीय महिला बुद्धिबळ संघाची सदस्या ग्रांडमास्टर सौम्या स्वामिनाथन यांनी ‘परस्युईंग युवर गोल’ या विषयी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या ध्येयाला केंद्रित करून त्यानुसार वाटचाल करावी. मेहनत, चिकाटीसोबत आलेल्या अनुभवातून शिकून पुढे जावे. असे प्रतिपादन केले.
करप्रणालीत बदलणे गरजेचे
देशातील करपध्धत अन्यायकारक असून थेट कर कमी आणि अप्रत्यक्ष कर जास्त लावले जात आहेत. करप्रणालीत बदल हवा. कर संकलन व्यवस्थापन बदलले पाहिजे. ‘करन्सी’ सतत फिरती असावी, जेणेकरून देशाचे आर्थिक आयुष्य निरोगी राहील. संपूर्ण जगात व्याजदर भारतातच अधिक आहे. तो कमी झाला तर उद्योग वाढीस लागून युवा रोजगाराचाही प्रश्न सुटेल, असे त्यांनी सांगितले. देशात सोन्याच्या खाणी नाही मात्र तरीही जगात दोन नंबरचे सोने भारतीयांकडे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर सत्र अध्यक्ष प्राचार्य डॉ. के.एस.वाणी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा.दिनेश पुरी यांनी केले.