सर्व श्रेय माझ्या वडिलांना देईन- बाबासाहेब पुरंदरे

0

मुंबई | ‘लहानपणापासूनच बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव कानी येत होते. पण ते कोण हे तेव्हा कळण्याचे वय नव्हते. माझ्या वडिलांकडूनही नेहमी त्यांचा उल्लेख येत असे. माझ्या आयुष्यात इतिहास सुरु झाला तो शिवाजी महाराजांपासून आणि क्रिकेट सुरु झाले ते शिवाजी पार्कापासून. आज या महान शिवशाहिरांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले’ असे कृतज्ञतापूर्वक उद्गार भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या शिवशाहीर सन्मान सोहळ्यामध्ये काढले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त स्वरगंधार आणि जीवनगाणी संस्थेने रविवारी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शिवशाहीर सन्मान सोहळा हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यास सचिन तेंडुलकर, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष किशोर रांगणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सचिन तेंडुलकरच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या सत्कारसमयी बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, वडील हे माझे सर्वांत जवळचे मित्र होते. ते प्रेमाने, मायेने बोलत. त्यांनी माझ्या गुणांवर फुंकर घालण्याचे काम केले. त्यामुळे माझ्या सर्व यशाचे श्रेय त्यांना देईन. आपल्या मुलांवर प्रेम करा. आपला वारसा त्यांच्याकडे द्या. कोणाचा द्वेष, तिरस्कार करू नका. आपण सर्व एक आहोत. मला विरोधी पक्ष हा शब्द आवडत नाही. प्रत्येकाने माझे सरकार आहे, हा भाव ठेवला पाहिजे. मला पुस्तक प्रकाशनासाठी मुंबईत येऊन कोथिंबीर विकावी लागली, याचे वाईट वाटते. असेही ते पुढे म्हणाले.

‘महाराष्ट्र भूषण असणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कारासाठी भारतरत्न स्वतः आले ही मोठी बाब आहे, असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले. बाबासाहेबांनी महाराष्ट्राला सोप्या पद्धतीने इतिहास समजावून सांगितला. एका मुलाखतीप्रसंगी मी त्यांना विचारले होते, तुम्हाला पेशव्यांपेक्षा शिवाजी महाराजांचा इतिहास का लिहावासा वाटतो, त्यावर ‘पेशव्यांनी केलेल्या चुका सांगण्यापेक्षा महाराजांनी केलेल्या अचूक गोष्टी सांगणे मला योग्य वाटले, असे उत्तर त्यांनी दिल्याची आठवणही राज ठाकरे यांनी सांगितली.

राज ठाकरे पुढे म्हणाले, की ‘राजकारणात श्रीमंत झाले ते बाबासाहेबांवर बोटे उगारत आहेत. इतिहासाला जातीपातीची लेबले लावली जात आहेत. बाबासाहेबांना या वयातही राज्यात पोलिस संरक्षणात फिरावे लागते, हे दुर्दैवी आहे, यापुढे बाबासाहेबांना पोलिस संरक्षणात फिरण्याची आवश्‍यकता नाही. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आहे’.