सर्व संपत्ती जप्त करा

0

पुणे : बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी मृत अब्दुल करीम तेलगीची सर्व संपत्ती सरकारजमा करावी, असा अर्ज शनिवारी त्याची पत्नी आणि आरोपी शाहिदा अब्दुल करीम तेलगी हिने वकिलांमार्फत पुणे सत्र न्यायालयात दाखल केला आहे. ताब्यात असलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता सरकारजमा करून त्यांचा वापर देशहितासाठी करावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. सरकारपासून ही बाब लपवून ठेवली तर अल्ला मला माफ करणार नाही, असेही शाहिदाने म्हटले आहे.

नऊ मालमत्ता कुटुंबीयांच्या ताब्यात
बनावट स्टॅम्प घोटाळ्याचा तपास करताना सीबीआयने तेलगीच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या. मात्र, कर्नाटकमधील नऊ मालमत्ता अजूनही तेलगीची पत्नी शहिदा आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या ताब्यात आहेत. यामध्ये मोकळ्या शेतजमिनी, कमर्शियल कॉम्पलेक्स, फ्लॅट्स आदींचा समावेश आहे. अब्दुल करीम तेलगीचा काही दिवसांपूर्वी तुरुंगात मृत्यू झाला आहे.

शाहिदाही विविध आजारांनी ग्रस्त
तेलगीची पत्नी शाहिदा हीदेखील मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या आजरांनी ग्रस्त आहे. आपल्या हयातीतीच स्टॅम्प घोटाळ्यातून कमावलेली सर्व मालमत्ता सीबीआयने जप्त कराव्यात आणि पुढे त्या सरकारजमा कराव्यात, असे शाहिदाने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.