सर अर्जंट काम आहे, बाहेर जाते!

0

पिंपरी-चिंचवड : शुक्रवारी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली. दोन तासिकांनाही तिने हजेरी लावली. त्यानंतर तिने प्राध्यापकांना काही अर्जंट कामानिमित्त बाहेर जाण्याची परवानगीही मागितली. जा, पण लवकर परत ये, असे प्राध्यापकांनी तिला सांगितले. बाहेर जाताच तिने थेट महाविद्यालयाचे टेरेस गाठले व तेथून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तातडीने तासिका थांबविण्यात आल्या व विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. शीतल ही वर्गातील अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या गुणवत्तेमुळेच घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असतानाही तिचा रसिकलाल धारिवाल फार्मसी कॉलेजात प्रवेश झाला होता. क्षुल्लक कारणावरून वडिलांनी मारहाण केल्याच्या रागातून तिने स्वतःला संपवून घेतले. या घटनेचा विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचेही महाविद्यालय परिसरात दिसून आले.

भावनेच्या भरात शीतलने उचलले टोकाचे पाऊल!
शीतलचे वडिल गोपाल जाधव हे जुन्या सांगवीतील पवारनगर येथे रहातात. त्यांचा भाजीपाला विकण्याचा छोट्याशा व्यवसाय आहे. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शीतलचा खराब झालेला लॅपटॉप दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे तातडीने पैसे उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु, लॅपटॉपअभावी शीतलच्या शैक्षणिक कामावर परिणाम होत होता. म्हणून तिने मावशीकडून 10 हजार रुपये घेऊन लॅपटॉप दुरुस्त केला. ही बाब गोपाल जाधव यांना शीतलने सांगितली नव्हती. त्यामुळे त्यांना जेव्हा ही बाब कळाली तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. त्यातून त्यांनी शीतलला मारहाण केली. तथापि, शुक्रवारी एक वाजता शीतलने आत्महत्या केल्याची घटना त्यांना कळली तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला होता. शीतल ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिच्या गुणांमुळेच तिचा रसिकलाल धारीवाल फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश होऊ शकला. ती अंतिम वर्षात शिकत होती. परंतु, प्रचंड भावनिक असलेली शीतल भावनेच्या आहारी जाऊन नैराश्यात गेली व आत्महत्या करून बसली. त्याबद्दल तिच्या आई-वडिलांनाही शोक अनावर झाला होता.

विद्यार्थ्यांमध्ये हळहळ!
पिंपरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हरिदास बोचारे यांनी शीतलच्या काही मित्रांचे व नातेवाईकांचे जबाब नोंदविले असून, त्यातून वडिलांनी मारहाण केल्याच्या नैराश्यातून शीतलने आत्महत्या केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या मारहाणीमुळेच शीतल काही दिवसांपासून नाराज राहात होती. मारहाणीमुळे तिला काही दुखापतही झाली होती, असेही समजते. शीतलने आत्महत्या केल्याची बाब पोलिसांनी जेव्हा तिच्या वडिलांना कळवली तेव्हा त्यांनी महाविद्यालय व रुग्णालयातही येण्यास नकार दिला. त्यांना प्रचंड धक्का बसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. तथापि, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना या घटनेचा मोठा धक्का बसला असल्याचे जाणवले. अनेक विद्यार्थिनींनी हळहळ व्यक्त केली.