उस्मानाबाद । एकाच कुटुंबातील एका महिलेसह तीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. तुळजापूर तालुक्यात सलगरा (दिवटी) या गावात मंगळवारी हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या चौघींनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरीही या चौघींची हत्या झाली असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या घटनेमागचे गूढ वाढले आहे.
मधुकर चव्हाण त्यांची पत्नी छाया चव्हाण(वय 40), मोठी मुलगी शीतल चव्हाण (वय 19), पल्लवी चव्हाण (वय 16) आणि अश्विनी चव्हाण (वय 15) या चौघींचे मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळले. मधुकर चव्हाण यांचा 12 वर्षांचा मुलगा कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतो आहे.मधुकर चव्हाण यांच्या तिन्ही मुली महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. मोठी मुलगी बी. ए. तृतीय वर्षात, दुसरी बारावीत आणि तिसरी मुलगी अकरावीत होती. एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेहावर साकाळलेले रक्त आणि मारहाणीचे व्रण आढळले आहेत. त्यामुळे या चौघींनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाला आहे.