सलग तीन दिवसाच्या आगीमुळे शेकडो झाडे जळून खाक 

0
बिजलीनगर एमआयडीसी रोडवरील धक्कादायक प्रकार, सर्रास जाळला जातो कित्येक टन प्लास्टिकचा कचरा
चिंचवड  : बिजलीनगर एमआयडीसी कॉलनी रोडवर अनेक दिवसांपासून प्लास्टिकचा कचरा जाळला जात आहे. या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचे सदस्य विजय मुनोत, विजय जगताप, बाबासाहेब घाळी, अमोल कानु, अमित डांगे, अमृत महाजनी, संतोष चव्हाण तसेच समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी व पडताळणी केली असता धक्कादायक बाब उजेडात आली.
भिंतीचा आडोसा घेऊन या ठिकाणी 200 टन पेक्षा जास्त कचरा जमा करून जाळला जात असल्याचे निदर्शनास आले त्याचप्रमाणे कचरा जाळला जात असताना आग बाजूलाच उभ्या असणार्‍या झाडांपर्यंत पोहचून शेकडो झाडे जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. पर्यावरण अभ्यासक विजय जगताप यांच्या दक्षतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात पर्यावरण प्रेमींना यश आले. त्यामुळे परिसरातील अनेक झाडांना जीवदान मिळाले .परंतु, गेल्या तीन दिवसांपासून सतत प्लास्टिकचा कचरा जाळला जात असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत आहे. तसेच धुरामुळे प्रदूषनातही वाढ होत आहे.
परिसरात ओढ्याच्या जवळच कचरा डम्पिंगचे ठिकाण असून दिवसभर या ठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण केले जाते. चिंचवड परिसरातील सर्व कचर्‍याच्या गाड्या इथे कचरा घेऊन येतात. गरीब, गरजू कचरा वेचक या ठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण करून मोठ्या प्रमाणात जमा झालेला प्लास्टिकयुक्त कचरा भिंतीच्या पलीकडे टाकतात. अश्या मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या प्लास्टिकच्या कचर्‍यास रात्री च्या वेळेस आग लावली जाते.
सतत जाळला जात असलेल्या कचर्‍यामुळे एमआयडीसी कॉलनीमधील भिंतीलगतचा आतील कित्येक मीटर भाग हा आता भग्न अवस्थेत पोहचलेला आहे. एकेकाळी गर्द झाडी असलेला झाडाचा परिसर हा आगीमुळे खाक झालेला आहे. प्लास्टिकचा कचरा जाळनार्‍यांनी तीन ठिकाणी एमआयडीसी कॉलनीच्या सुरक्षा भिंतीला भगदाड पाडले आहे. सतत लावणार्‍या आगीमुळे शेकडो झाडे खाक होऊन पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. महापालिकेने तातडीने सदरच्या परिसराची पाहणी करून कचरा जाळणे बंद करावे.