लोणावळा । होळी आणि त्याला जोडून शनिवार व रविवार या तीन दिवसांच्या सलग सुट्ट्या आल्याने मोठ्या प्रमाणात लोक फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत. यामुळे 1 मार्चला रात्रीपासूनच एक्स्प्रेस वे वरील वाहतूक अतिशय संथगतीने सुरू आहे.
गुरुवारी रात्री गोल्डन हावर्समुळे अवजड वाहने ही खोपोली व लोणावळा परिसरात रोखून धरली होती. ती उशिरा सोडण्यात आल्याने रात्रभर एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शुक्रवारी पहाटेपासून वाहनांची संख्या वाढू लागल्याने पुण्याकडे येणार्या मार्गावर आडोशी बोगदा ते अमृतांजन पूलादरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली नसली तरी अतिशय संथ गती वाहतूक सुरू होती. वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान, दिवसभर एक्स्प्रेस वेवर असेच चित्र होते. या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे. अथवा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.