मुंबई । सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई-पुणे जुना महामार्ग जाम झाला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून त्यामुळे पर्यटनासाठी सकाळीच बाहेर पडून सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. या आठवड्यात शनिवार, रविवार आणि त्यानंतर सोमवारी नाताळ अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. जागोजागी 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रत्येक वाहनचालकाला पुढे जाण्याची घाई, मुंबई-पुणे महामार्ग खोपोली घाट ते अंडा पॉईंटपर्यंत या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. लहान मुले आणि महिला गाड्यातून प्रवास करत असल्याने त्यांना या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एकाच वेळी हजारोंच्या संख्येत वाहने रस्त्यावर आल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऐरोली टोलनाक्यावर पुन्हा वसुली
मुंबईबाहेर जाणार्या महामार्गांवर गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्याचवेळी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या ऐरोली टोलनाक्यावर ’वसुली’ केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. याबाबत माहिती मिळताच काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी ऐरोली टोलनाकाच बंद पाडला होता. मात्र, कार्यकर्ते निघून गेल्यानंतर पुन्हा टोलवसुली सुरू झाली आहे. कळवा-विटावा येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने ठाण्याच्या दिशेकडील वाहतूक ऐरोलीमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे चालकांना ऐरोली नाक्यावरही टोल भरावा लागत आहे. आर्थिक भुर्दंड बसत असल्याने चालक संताप व्यक्त करत आहेत. तसेच टोलवसुलीसाठी वाहने थांबवल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत काल टोलनाक्यावर धडक दिली. तेथील टोलवसुली बंद पाडली. मात्र, कार्यकर्ते निघून गेल्यानंतर टोलनाक्यावर पुन्हा वसुली सुरू झाली आहे.
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. ठाण्याच्या दिशेने जाणार्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरीकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळे त्याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर 25 डिसेंबरपर्यंत ’नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. याचदरम्यान वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे. यामुळे नवी मुंबईकडून बेलापूर रोडने आणि ऐरोली पटणी कंपनी मार्गे विटावा-कळवा- ठाण्याचे दिशेने येणार्या सर्व प्रकारच्या वाहनास पटणी कंपनीकडून बेलापूर रोडला मिळणार्या ठिकाणी प्रवेश बंद केला आहे. याचा फटका सीएसटीहुन ठाण्याच्या दिशेनं जाणार्या वाहनांना देखील बसला. ईस्टर्न एकप्रेस हायवे मुलुंडपासून भांडुपपर्यत तसेच ऐरोली हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
पिवळ्या रेषेबाहेरील वाहनांना टोल भरावा लागणार नाही
टोलनाक्यापासून 10 वाहने उभी राहतील इतक्या अंतरावर असलेल्या पिवळ्या रेषेबाहेरील वाहनांना टोल भरावा लागणार नाही, असा नियम असताना ऐरोली टोलनाक्यावर राजरोस टोलवसुली केली जात असल्याचे चालकांकडून सांगण्यात येत आहे. टोलकंपन्यांकडून सरकारचा नियम सर्रास धाब्यावर बसवला जात आहे. याबाबत, सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला सांगितले, की ’पिवळ्या रेषेबाहेर असलेल्या वाहनांना टोल माफ आहे. तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तरीही टोल आकारल्यास कारवाई करण्यात येईल.’ असा इशाराही देण्यात आला आहे.