सलग 18 तास अभ्यासाच्या उपक्रमाद्वारे केले अभिवादन

0

भुसावळ। विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा असा संदेश दिला होता. यानुसार अनुकरण करीत तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त सलग 10 व्या वर्षी सुध्दा मुख्याध्यापक जर्नादन जाधव यांनी ‘एकच ध्यास सतत 18 तास अभ्यास’ हा उपक्रम यंदाही सर्व विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांसह नियोजनबध्दपणे राबविण्यात आला. या अनोख्या उपक्रमाद्वारे महामानवास अभिवादन करण्यात आले.

प्रतिमा पूजनाने करण्यात आले उद्घाटन
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेऊन अभ्यासाला महत्व दिले. मुख्याध्यापक जाधव यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आले. हा उपक्रम सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सतत 18 तास विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन अभिवादन केले.

कार्यक्रमास यांनी दिल्या भेटी
कार्यक्रमास प्रा. डिगंबर खोब्रागडे, प्रा. वंशिका खोब्रागडे, एस. चंद्रा, अशोक शिंदे तसेच अनेक मान्यवरांनी भेटी देवून उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. यशस्वीतेसाठी अशोक सपकाळे, ईश्‍वर सपकाळे व शाळेचे शिक्षक वर्ग, पालकांनी
परिश्रम घेतले.

शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न
मुख्याध्यापक जाधव हे दरवर्षी स्वखर्चातून हा उपक्रम करीत असतात. उपक्रमाचा मुळ उद्देश शाळेतील विद्यार्थ्यांनी दररोजच्या जीवनात जास्तीत जास्त अभ्यास करुन शैक्षणिक प्रगती करावी. हा उद्देश आहे. या शाळेत जाधव विविध प्रकारचे उपक्रम घेत असतात. त्यामुळे या जिल्हा परिषद शाळेत दरवर्षी अनेक खाजगी शाळांमधून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. कार्यक्रमास ईश्‍वर सपकाळे या माजी विद्यार्थ्याने स्वखर्चाने बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानांतर्गत पोस्टर प्रदर्शन लावण्यात आलेले होते.