मुंबई । बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची ‘बीइंग ह्युमन’ संस्था चांगलीच अडचणीत आली आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्वावर डायलेसिस केंद्र उभारण्यासाठी सलमानच्या ‘बीइंग ह्युमन’ फाऊंडेशन या संस्थेची निवड केली होती. मात्र संस्थेने अद्याप कामाला सुरुवात न केल्यामुळे महापालिकेने या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महापालिकेने सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्वावर डायलेसिस केंद्र उभारण्यासाठी जेव्हा निवड केली तेव्हा या फाउंडेशनची बरीच चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र सव्वा वर्ष उलटले तरी सलमानच्या संस्थेने कामाला अजूनही सुरुवातही केली नाही. त्यामुळे मुंबई पालिका ’बीइंग ह्युमन’ला काळ्या यादीत टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजते. महापालिकेने सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्त्वावर 12 डायलेसिस केंद्र उभारण्यासाठी स्वयंसेवी संस्था, कंपन्यांकडून 2016 मध्ये निविदा मागवल्या होत्या. यामध्ये डायलेसिस केंद्र उभारण्यासाठी ’बीइंग ह्युमन’ संस्थेची निवड झाली होती. महापालिकेपेक्षा तीन टक्के दराने कमी किमतीत ’बीइंग ह्युमन’कडून डायलेसिसची सुविधा देण्यात येणार होती. या संस्थेकडून 24 डायलेसिस यंत्रे बसवणे अपेक्षित होते, असे असताना संस्थेमार्फत कामाला अजूनही सुरुवात झाली नाही.