सलमानप्रति सहानुभूती नकोच!

0

बॉलिवूडमध्ये नशिबाने कायम यशाच्या शिखरावर उभे राहायला मिळाले, हे सलमान खानसाठी पर्यायाने त्याच्या स्वभावासाठी मारक ठरले आहे. आज लाखो जण सलमान खान गजाआड आहे, यामागे त्याचा कर्मदरिद्रीपणा कारणीभूत आहे, अशी भावना व्यक्त करत आहेत. सध्याच्या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हे आता प्रमुख माध्यम बनले आहे. कारण कालपर्यंत जी प्रचलित माध्यमे होती, ती उपलब्ध माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत होती, त्यानंतर सर्वसामान्य आपापली मते बनवत होती आणि मग ‘प्रचलित माध्यमांच्या माहितीचा परिणाम झाला’, असे म्हटले जात होते. आज परिस्थिती वेगळी आहे. सलमानला ज्या क्षणाला गजाआड करण्यात आले, त्या क्षणापासून सर्वसामान्य जण आपापली मते बनवून ती सोशल मीडिया नावाच्या माध्यमातून सर्वत्र पसरवू लागली. म्हणूनच मागील दोन दिवसांपासून सलमान सोशल मीडियात सर्वाधिक चर्चेला आलेले व्यक्तिमत्त्व ठरले आहे. असो. तर या सोशल मीडियातून सलमानप्रती संवेदना व्यक्त करणार्‍यांपेक्षा त्याच्यावर टीका करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे प्रचलित माध्यमे अर्थात वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या हेदेखील चक्रावून गेले. त्यामुळे नाइलाजास्तव या प्रचलित माध्यमांनाही सोशल मिडीयाने सलमान प्रकरणात जो स्टॅण्ड घेतला आहे, त्याअनुषंगाने वृत्तसंकलन करणे सुरू केले. हा धागा ‘कायद्याचा सन्मान’, ‘पशुपक्ष्यांचे रक्षण’, ‘हेकेखोर स्वभावाचा प्रतिबंध’, अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांना धरून होता.

सलमान खान प्रकरणामुळे सामाजिक विचारमंथन सुरू झाले आहे आणि ते सोशल मीडियातून होऊ लागले आहेत. म्हणून सोशल मीडियातून सलमान खान प्रकरणात निर्माण झालेले मतप्रवाह कोणकोणते आहेत आणि ते योग्य-अयोग्य आहेत का, याचा ऊहापोह या ठिकाणी करू या!

त्यातील सर्वात महत्त्वाचा मतप्रवाह म्हणजे काळवीटाच्या शिकार प्रकरणात तब्बल 20 वर्षे दिरंगाई का झाली? अर्थात हा विषय न्यायपालिकेचा आहे. या प्रकरणात साक्षीदार तपासणे, पुरावे सिद्ध करणे अशा एक ना अनेक न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रिया येत असतात. म्हणून हा खटला इतका वर्षे चालला, असा यिुक्तवाद काही कायदेतज्ज्ञांनी केला. मात्र खरंच या प्रकरणाचा न्यायनिवाडा होण्यासाठी दोन दशके लागणे, समर्थनीय आहे का, असा जेव्हा सद्सद्विवेक बुद्धीने विचार केला, तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच मिळतेय. त्यामुळे या प्रकरणातील न्यायदानाच्या प्रदीर्घ काळाचा एक धोरण म्हणून गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे आणि त्याअनुषंगाने अन्य न्यायप्रविष्ट खटले निकाली काढण्याबाबत ठोस निर्णंय घेणे गरजेचे बनले आहे.

दुसरे म्हणून सलमानच्या अटकेमुळे बॉलिवूडचे 500 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. म्हणून सलमान खान निर्दोष सुटावा, असे न्यायालयाच्या निर्णयाआधी मतप्रवाह होता. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवल्यानंतर बॉलिवूडचे आर्थिक नुकसान टाळावे, म्हणून त्याला जामीन द्यावा, असा नवीन मतप्रवाह सुरू झाला. खरे तर सलमानने जे चित्रपट साइन केले आहेत, हा त्याच्या वैयक्तिक अर्थार्जनाचा, कमाईचा विषय आहे आणि त्याला सोबत घेऊन चित्रपट काढण्याचे ठरवणारे निर्माते, दिग्दर्शक यांचाही तो वैयक्तीक विषय आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार म्हणून कारागृहात पाठवलेल्या सलमान खानला जामीन देऊन त्याला बाहेर काढावा, हा युक्तिवाद कायद्याचे हनन करणारा ठरेल. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये न्यायपालिकेप्रति शंका निर्माण होईल, ही ‘शंका’ लोकशाही व्यवस्थेसाठी घातक ठरू शकते. म्हणून सलमान खानला दिलेली शिक्षा त्याला भोगावला भाग पाडणे, यामुळे कायद्याचा सन्मान होणार आहे.

तिसरे सलमान खान ‘बिंग ह्युमन’ या त्याच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य करतो, म्हणून त्याच्या हातून झालेल्या गुन्ह्याकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहून त्याला माफ करावे, असा मतप्रवाह आहे. सलमान खानचे सामाजिक कार्य आणि त्याने केलेला गुन्हा या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत तसेच त्यांचे स्वरूपही दोन टोकांचे आहेत. सलमान खानने सामाजिक कार्य करतो म्हणून कायद्याच्या चौकटीबाहेर जावून त्याला सहानुभूती दाखवावी, ही अपेक्षा कायद्यासाठी मारक ठरणारी आहे. मुळात हे म्हणजे ‘अमुक एक जण लोकांना रोजी एक वेळचे जेवणे देतो म्हणून त्याने केलेला एक खून माफ करावा’, असेच म्हणण्यासारखे आहे. त्यामुळे सोशल मीडियात जे कोणीही असा मतप्रवाह मांडत आहेत, त्यांनाही त्यांच्या विचारांची गल्लत करू नये.

चौथा मतप्रवाह असा आहे की, आज माणसांना मारणारे मोकाट फिरत आहेत पण एका जनावराला मारले म्हणून तुरुंगवास, असा दुजाभाव का होत आहे? ही कायद्यामधील काही अंशी तूट असेल. मात्र, म्हणून सलमान खानचा गुन्हा आणि अन्य असंख्य मनुष्यवधाचे गुन्हे ज्यामध्ये आरोपी जामिन्यावर बाहेर आहेत, त्यांच्याशी संबंध जोडून सलमानला जामीन देणे संयुक्तिक ठरू शकणार नाही. तसेही ‘हिट अ‍ॅन्ड रन’ प्रकरणात सलमान खानच्या हातून मानवी हत्याच झाली होती, मात्र कायद्यातीलच पळवाट शोधून तो त्यातून निर्दोष सुटला. त्यामुळे त्याच्याबाबत ही मोजमाप लावणार्‍यांनी आधी याचे उत्तर देणे गरजेचे आहे.

सलमान खान स्वभावानेही तितका गुणसंपन्न नाही, हे सारे बॉलिवूड जाणतेय. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे बिग बॉस! ‘बिग बॉस’च्या घरात एक खळबळजनक घटना घडली होती. त्यातील एक स्पर्धक जुबैर खान याच्यावर सलमान चांगलाच संतापला. ‘जब तुम यहां आए थे तो तुम्हारी कोई औकात वैसे ही नहीं थी. यह किसी का दामाद नहीं है. जिस परिवार से यह अपना नाम जोड़ता है इसका उससे कोई लेना-देना नहीं है. अपनी औकात दिखानी है न तो निकाल गंदगी मेरे सामने. जुबैर यहां अपनी इमेज बनाने आया है या इमेज डुबाने आया है,’ असे सलमान नॅशनल टीव्हीवर जुबैरला बोलला होता. जुबैर टेन्शनमध्ये आला आणि त्याने खूप सार्‍या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर जुबैरला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. लोणावळा येथील पोलीस स्टेशनमध्ये जुबैरने सलमानविरोधात तक्रारही दाखल केली. सलमानने बिग बॉस या कार्यक्रमात मला धमकी दिली असून ‘तू घरातून बाहेर पडल्यावर इंडस्ट्रीत तू काम करू शकणार नाही नाही’ असे मला धमकी देताना तो म्हणाला तसेच ‘तू घर सोडल्यावर मी तुला माझा कुत्रा बनवणार आहे. तू बाहेर ये, तुला मी सोडणार नाही’, असे कॅमेर्‍याच्यासमोर सलमानने म्हटले असल्याचे जुबैरने तक्रारीत नमूद केले होते. हे एक वांगणीदाखल उदाहरण आहे, अशी उदाहरणे सलमान कायम घडवत असतो. त्यामुळे अवघे बॉलिवूड सलमानच्या दहशतीखाली आहे, त्याच्याविरोधात कुणी बोलत नाही, जो त्याला विरोध करेल, त्याला तो काहीच काम मिळू देत नाही, अशी त्याची त्रास देण्याची राक्षशी प्रवृत्ती आहे, यावरून सलमान खानचे व्यक्तिमत्त्व माणूस म्हणून खरोखरीच अयोग्य असून तो त्याच्या या स्वभावामुळेच कोणत्याही सहानुभूतीच्या लायक ठरत नाही.

सलमानला सहानुभूती : लोकशाहीत चुकीचा पायंडा…
आज लाखो जण सलमान खान गजाआड आहे, यामागे त्याचा कर्मदरिद्रीपणा कारणीभूत आहे, अशी भावना व्यक्त करत आहेत. सलमानला ज्या क्षणाला गजाआड करण्यात आले, त्या क्षणापासून सर्वसामान्य जण आपापली मते बनवून ती सोशल मीडिया नावाच्या माध्यमातून सर्वत्र पसरवू लागली. म्हणूनच मागील दोन दिवसांपासून सलमान सोशल मीडियात सर्वाधिक चर्चेला आलेले व्यक्तिमत्त्व ठरले आहे. सलमान खान हे व्यक्तिमत्त्व नेहमी वादात सापडणारे आहे. त्यांच्यातील स्वार्थी, लोभी, खूनशी, हेकेखोर, विध्वंसक, स्त्रीलंपट अशा एक ना अनेक दुर्गुणांमुळे हे वाद निर्माण झालेले आहेत. सलमान खान आज कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे, त्यातून त्याची सुटका करावी, त्याला जामीन द्यावा, असा मतप्रवाह आहे, तसे झाल्यास ते कायद्यासाठी मारक ठरेल तसेच लोकशाही प्रणालीत चुकीचा पायंडा पाडणारे ठरेल!

सलमान खान आणि त्यांच्याशी जोडलेले वाद
* 1998 :’हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटाची शिकार
* 2002 : हिट अ‍ॅन्ड रन या प्रकरणात मन्ाुष्यवध, त्यातून निर्दोष मुक्तता
* 2002 : अभिनेत्री ऐश्‍वर्या रायला त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार
* 2003 : अभिनेता विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात मारामारी
* 2006 : बाबुल चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी जॉन इब्राहिम याच्याबरोबर मारामारी
* 2008 : अभिनेत्री कतरीना कैफच्या वाढदिवशी शाहरुख खानसोबत वादावादी
* 2010 : मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा दोष नसून भारतीय सुरक्षाव्यवस्थेचे अपयश’, असे वादग्रस्त वक्तव्य केले
* 2015 : 93च्या बाँबस्फोटातील आरोपी याकूब मेमनची बाजू घेतली, त्यावर वडील सलीम खान यांनी त्याच्यावतीने देशाची माफी मागितली.
* 2016 : ’पाकिस्तानी कलाकार हे आतंकवादी नाहीत. त्यांना सरकार व्हिसा देते’, असे वादग्रस्त विधान केले.

– नित्रानंद भिसे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8424838659