सलमान तुरुंगातच; उद्या जामिनावर सुनावणी

0

51 पानांच्या जामीनअर्जावर विचार करण्यासाठी कोर्टाने मागितला वेळ
सलमानला भेटण्यासाठी प्रिती झिंटासह त्याच्या बहिणींची तुरुंगात धाव

जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या अभिनेता सलमान खान याच्यावतीने जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल जामीनअर्जावर विचार करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुमार जैन यांनी एका दिवसाचा वेळ मागितल्याने सलमानची शुक्रवारीदेखील जामिनावर सुटका होऊ शकली नाही. त्याच्या वकिलांनी तब्बल 51 पानांचा जामीनअर्ज दाखल केला असून, तो तपासण्यासाठी न्यायालयास वेळ लागत आहे. त्यामुळे सलमानची शुक्रवारची रात्रदेखील मध्यवर्ती तुरुंगातच जाणार आहे. शनिवारी जामीनअर्जावर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने दाखविली आहे. या अर्जावर तातडीने निर्णय घेण्यासारखे काही नाही, अशा शब्दात न्यायाधीशांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, सलमानला भेटण्यासाठी त्याच्या बहिणी अर्पिता अलविरा यांच्यासह अभिनेत्री प्रिती झिंटा हिने जोधपूर तुरुंगात हजेरी लावली व त्याची विचारपूस केली.

असा झाला कोर्टात युक्तिवाद..
सलमान खानच्या वकिलांनी जामिनासाठी 51 पानी अर्ज दाखल केला असून, जामीन मिळावा म्हणून तब्बल 54 मुद्दे सादर केले आहेत. त्याबाबत त्याचे वकील महेश बोडा यांनी सांगितले, की या खटल्याशी जुळलेल्या अन्य तीन प्रकरणात सलमानला निर्दोष सोडण्यात आलेले आहे. त्या आधारेदेखील जामीन मिळू शकतो. हा खटला 20 वर्षांपासून सुरु असून, त्याला जेव्हा न्यायालयाने बोलावले तेव्हा त्याने न्यायालयापुढे हजेरी लावलेली आहे. या काळात तो कधीही तुरुंगात गेला नाही, तेव्हा आतादेखील त्याला तुरुंगात ठेवू नये, असा युक्तिवाद आम्ही जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे केला आहे, असेही अ‍ॅड. बोडा यांनी सांगितले. तथापि, या अर्जावर जिल्हा न्यायाधीशांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत, उद्यावर सुनावणी ठेवली होती. तर सरकारी वकील पोकराम बिश्‍नोई यांनी सांगितले, की उच्च न्यायालयाने या खटल्याशी निगडीत प्रकरणातून सलमानला निर्दोष सोडल्याच्या कारणावरून जामीन देता येणार नाही. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून, कोणत्याही खटल्याशी या खटल्याची तुलनाच करता येऊ शकत नाही. सलमानच्या वकिलांनी जे तर्क मांडले आहेत, ते सलमानला शिक्षेतून बचाव करण्यासाठी ठीक आहे, जामीन मिळविण्यासाठी नाही, असेही बिश्‍नोई यांनी सांगितले. सलमानला जामीन देऊ नये, अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

शनिवारी ठरणार जामिनाचे भवितव्य
सलमान खानच्या जामीनअर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी सुनावणी करणार आहे. जर या न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला तर ठीक अन्यथा त्याच्या वकिलांना जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. रविवार पाहाता, त्याला आणखी एक दिवस तुरुंगात काढावा लागण्याची शक्यता आहे. सोमवारीच त्याचा जामिनासाठीचा उच्च न्यायालयात दाखल करावा लागणार आहे. दरम्यान, सलमानला भेटण्यासाठी अभिनेत्री प्रिती झिंटा हिने शुक्रवारी जोधपूर तुरुंगात हजेरी लावली होती. विमानतळावर तिला प्रसारमाध्यमांनी गाठल्यानंतर तिने काहीही बोलण्यास नकार दिला. विमानतळावर उतरताच ती सरळ तुरुंगात गेली.