दुबई । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरूवारी 19 वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर केले. त्यात सलामीच्या लढतीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. हा सामना स्पर्धेचा उद्घाटनीय सामना असेल. या स्पर्धेला पुढील वर्षी 13 जानेवारी रोजी सुरूवात होणार असून अंतिम सामना 3 फेब्रुवारीला खेळवण्यात येईल. भारताचा या स्पर्धेसाठी ब गटात समावेश करण्यात आला असून या गटात ऑस्ट्रेलिया, झिंम्बावे आणि पूर्व आशियामधून पात्र ठरलेल्या पापुआ न्यू गिनीचा समावेश आहे.
मुख्य स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी सराव सामन्यांमध्ये भारताचा 9 जानेवारी रोजी दक्शिण आफ्रिकेशी आणि 11 जानेवारीला केनियाशी सामना होईल. गतविजेते असलेल्या वेस्टइंडिजचा पहिला सामना यजमान न्यूझीलंडशी होणार आहे. या दोन्ही संघाना अ गटात 2012 मधील विजेते दक्शिण आफ्रिका आणि आफ्रिका खंडातून पात्र ठरलेल्या केनिया यांच्यासोबत ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील क गटात कॅनडा, इंग्लंड आणि नामिबीयाचा समावेश करण्यात आला आहे. दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या पाकिस्तानसह श्रीलंका आशिया खंडातून पात्र ठरलेल्या अफगणीस्तान आणि युरोपमधून पात्र ठरलेल्या आयर्लंड ड गटात आहेत. स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपर लीग खेळतील तर उर्वरीत आठ संघ प्लेट चॅम्पियनशिपमध्ये खेळतील.