सलून कारागिरांच्या रात्रीच्या सेवेमुळे भावी सैनिकांचा मार्ग झाला सुकर

0

सैन्यभरतीस्थळी रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत सेवा ; उमेदवारांच्या लागताय रांगा

जळगाव (किशोर पाटील)- शहरातील नऊ जिल्ह्यासाठी सैन्यभरतीची प्रक्रिया सुरु आहे. यादरम्यान प्रवेशपत्रावरील छायाचित्र आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्षात उमेदवार दिसावा, व त्यालाच प्रवेश मिळेल असे बंधनकारक आहे. यासाठी छायाचित्रात आहे तसे दिसण्यासाठी अनेक उमेदवारांना दाढी करुन जावे लागत आहे. या कारणाने उमेदवारांची गैरसोय तसेच नुकसान होवू नये म्हणून रात्रीच्या वेळी 3 ते 4 चार सलून कारागिरांनी मैदानाबाहेर उघड्यावर दुकान थाटले आहे. रात्री 9 ते सकाळी 5 यावेळेत अत्यंत माफक शुल्कात ते सेवा देत असून यामुळे प्रत्येक उमेदवारांचा भरतीचा मार्ग सुकर झाला आहे. शनिवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पारोळा व चाळीसगाव तालुक्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यंदा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन सैन्य भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन प्रवेशपत्रही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यावर उमेदवारांना पासपोर्ट छायाचित्र चिटकवायाचा आहे. चिटकविलेल्या छायाचित्राप्रमाणे प्रत्यक्षात दिसत असलेल्या उमेदवारालाच भरती प्रक्रियेसाठी संधी दिली जात आहे.

रात्रीच्या वेळी सलूनची दुकाने बंद
छायाचित्रात आहे तसे दिसण्यासाठी अनेक उमेदवारांवर दाढी करण्याची वेळ आली. याबाबत एैनवेळी माहिती मिळाल्याने तसेच नेमके रात्रीच्या वेळी अनेक दुकाने बंद असल्याने उमेदवारांची गैरसोय होत होती. अनेक जण प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली.

रात्रभर जागून सलून कामगार देताहेत सेवा
दाढी करण्याच्या किरकोळ कारणावरुन भरतीप्रक्रियेपासून कुणीही उमेदवार वंचित राहू नये, प्रत्येकाला संधी मिळावी. या उद्देशाने शहरातील दिलीप तापीराम सोनवणे, सोनू नामदेव बिडकर, योगेश राजेश सोनवणे व तालुक्यातील दापोरी येथील प्रभाकर श्रावण साळुंखे या चार सलून कामगारांनी भरतीच्याठिकाणी पोलीस मैदानाबाहेर उघड्यावर दुकान थाटले असून मोबाईल, तसेच चार्जिंग बॅटरीच्या उजेडात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत सेवा देत आहे. दाढी करुन घेण्यासाठी अनेक उमेदवारांच्या रात्री रांगा लागत असल्याची स्थिती आहे. नियमित दरापेक्षा अंत्यत माफक शुल्कातसेवा मिळत असल्याने भावी सैनिकांनी सलून कामगारांचे आभार मानले आहे.

तरुणांना संधी मिळणे हाच सेवाभावी उद्देश -दिलीप सोनवणे
रात्रीच्या वेळी दुकाने बंद असल्याने उमेदवारांची गैरसोय होत होती, हे लक्षात आल्याने दिवसा दुकानात व रात्री उमेदवारांसाठी मैदाना बाहेर उघड्यावर दुकान थाटले. पैसे कमविण्यापेक्षा दुर-दुरुन आलेल्या उमेदवारांचे नुकसान होवू नये प्रत्येकाला संधी मिळावी, हा सेवाभावी उद्देश असून यातून आम्हालाही दोन पैसे मिळत असल्याचे सलून कामगार दिलीप तापीराम सोनवणे म्हणाले.