जळगाव:सध्या कोरोनाच्या काळात सलून व्यावसायिक, ब्युटी पार्लर, स्पा, फ़िजिओथेरपीस्ट, टॅटू आदी व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे ३-४ महिने हे व्यवसाय पूर्णत: बंद होते. मात्र ‘संकटातून नवीन संधी निर्माण होते’ ही म्हण खरी आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या सेवा क्षेत्रातील उद्योगांना ई-कॉमर्स बिझनेसचा आधार मिळू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या उद्देशाने जळगाव शहरातील काही तरुणांनी मिळून the barbers Express’ या नावाने मोफत ऑनलाईन सलून अपॉईटमेंट अॅप व वेबसाईट विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांच्या वेळेत बचत तर होणारच आहे, विशेष म्हणजे ग्राहक अधिक वेळ सलून दुकानात बसणार नाहीत. त्यामुळे गर्दी टाळण्यात मोठी मदत होणार आहे. अपॉईटमेंट घेतल्यानंतर लागलीच सलून,ब्युटी पार्लर, स्पा, फ़िजिओथेरपीस्ट, टॅटू आदी सेवेचा लाभ घेणारा आहे. सोयीच्या वेळेनुसार अपॉईटमेंट घेता येणार आहे.
प्रमोद चौधरी, स्वप्नील भावसार, निखील क्षीरसागर, प्रतिक कुलकर्णी, प्रतिक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कल्पना अमलात आणली आहे. त्यांनी दोन अॅप्स आणि वेबसाईटची निर्मिती केली आहे. त्यातून लोकांना एकत्र आणता येणार आहे, तेही गर्दी न होऊ देता. यातून पुन्हा रोजगाराला चालना मिळणार आहे. यातून सलून व्यवसायाचे डिजिटल क्षेत्रात पाऊल पडणार आहे.
या अॅपवर सौदर्य प्रसाधनाच्या वस्तू देखील कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातून खरेदी-विक्रीला देखील चालना मिळणार आहे.