पिंपरी-चिंचवड : महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही कामासाठी सल्लागार नेमले जात आहेत. सल्लागारांनी काढलेली कामे म्हणजे नियोजन करून करदात्या नागरिकांच्या पैशांची लयलूट होणार आहे, हे निश्चित आहे. महापालिकेचे अधिकारी निष्क्रिय झालेत का? त्यामुळे सल्लागारांची नेमणूक केली जात आहे, असा सवाल स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांकडे उपस्थित केला आहे. तसेच विरोधात असताना आताचे राज्यकर्ते सल्लागार नेमण्यासाठी विरोध करत होते. आता मात्र, सल्लागारांसाठी त्यांनी ’स्वागत कक्ष’ उभारला आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.
सल्लागारांचा नवा पायंडा
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना दिलेल्या निवेदनात शितोळे यांनी म्हटले आहे की, शहराचा विकास संपूर्ण देशाने पाहिला आहे. देशातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेली ही महापालिका आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत सल्लागार नेमून कोणत्याही कामांकरिता करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यातून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी केल्याचे जाणवत आहे. 2017 पूर्वी सल्लागारांना तीव्र विरोध करणारे आता सत्ताधारी झाल्यावर सल्लागारांना ‘स्वागत कक्ष’ उभारुन बसले आहेत.
आयुक्तांमध्ये प्रशासक दिसत नाही
सर्व सल्लागारांवर कामाची जबाबदारी निश्चित करावी. पूर्ण कामाचे आयुष्यमान निश्चित करावे, अशी मागणी यापूर्वी केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले. आयुक्त महोदय, आपण प्रशासकीय भूमिकेत दिसत नाही. शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशांचा विनियोग कामांकरिता व्हावा, यासाठी आग्रही जाणवत नाहीत. पालिकेने सल्लागार नेमून केलेल्या सर्व विकासकामांची चौकशी करावी. त्यासाठी ‘सीओपी’ किंवा आयआयटी यांची नेमणूक करावी. चुकीची कामे असतील तर त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही शितोळे यांनी निवेदनातून केली आहे.
शितोळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
आरोप करणारे शितोळे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगवी परिसरात राहणारे आहेत. सलग दोन टर्म ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. यात त्यांनी एकदा स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. मागील निवडणूकीत त्यांना स्थानिक गटबाजीतून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना त्यात अपयश आले. शितोळे यांची प्रतिमा अभ्यासू व निडर अशी आहे. त्यामुळे त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाला व केलेल्या आरोपाला महत्व आहे.