पुणे । महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यानुसार, पालिकेच्या 2017-18 अंदाजपत्रकात 15 कोटींची तरतूदही केली आहे. मात्र, हे महाविद्यालय उभारण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प आराखडा तयार करणे तसेच त्याच्या मान्यता मिळवून देण्यासाठी महापालिकेने दिलेल्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टमध्ये कोणीही सल्लागार संस्था पुढे आलेली नाही. त्यामुळे या जाहीरातीस पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या महाविद्यालयास महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाची परवानगी मिळवायची असल्यास त्यासाठी पालिकेकडे सलग 10 एकर जागा असणे आवश्यक आहे. ही जागाच महापालिकेकडे नसल्याने हे महाविद्यालय पुन्हा घोषणे पुरतेच राहणार आहे.
मुदत वाढ देण्याचा निर्णय
काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित केले होते. मात्र, त्यास मान्यता न मिळाल्याने हा प्रस्ताव मागे पडला होता. त्यानंतर पुन्हा सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपने महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी पुन्हा हालचाली केल्या. तर स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय या नावाने हे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा करत त्यासाठी 15 कोटींची भरघोस तरतूदही केली. त्यानुसार, प्रशासनाने हे महाविद्यालय उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केली असली तरी पालिकेने दिलेल्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टकडे सल्लागारांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टला मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
…अन्यथा महाविद्यालय शहराबाहेर हलवणार
महाविद्यालय उभारण्याच्या नियमानुसार, अ दर्जाची महापालिका असल्यास वैद्यकीय महाविद्यालय उभारायचे असल्यास महापालिकेस सलग दहा एकर जागेची आवश्यकता आहे. एवढी मोठी जागा तूर्तास महापालिकेकडे कोठेही नाही. या शिवाय हे महाविद्यालय मान्यता मिळताच सुरू करायचे असल्यास पालिकेकडे त्यासाठी शैक्षणिक इमारतीचे बांधकामही असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सध्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाची जागा या महाविद्यालयासाठी पुढे केली जात आहे. मात्र, ही जागा सुध्दा 7 एकरच आहे. तर या जागेच्याजवळ 1 एकर जागेत झोपडपट्टी असून अर्धा एकर जागेत पालिकेचे अग्निशमन केंद्र तर काही जागेत पालिकेचा मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्प आहे. या तीन जागा पालिकेला आधी रिकाम्या कराव्या लागतील. तर या जागा पालिकेने रिकाम्या केल्याच तरी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाला संसर्गजन्य आजार रूग्णालयाचा दर्जा दिला आहे. हा दर्जा शासनाकडून रद्द करावा लागेल. अथवा हे रूग्णालय शहराबाहेर हलवावे लागेल. तरच या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारणे शक्य आहे.