सल्लूभाई जामिनावर सुटला!

0

काळवीट शिकारप्रकऱणी दोन दिवसांत मिळाला जामीन
जामीनअर्जावर सुनावणी करणार्‍या न्यायाधीशाची बदली
50 हजाराच्या जातमुचलक्यावर मिळाला सशर्त जामीन

जोधपूर : जोधपूर जिल्ह्यातील कांकाणी येथील काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खान याला अखेर दोन दिवसांत जामीन मिळाला आहे. या खटल्यात सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. परंतु, सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी दुपारी तीन वाजता 25 हजाराच्या प्रत्येकी दोन जातमुचलक्यांवर सलमानला सशर्त जामीन दिला. विशेष बाब म्हणजे, न्यायाधीश जोशी यांची शुक्रवारीच बदली करण्यात आली होती. परंतु, बदली ठिकाणी नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी सलमानच्या अर्जावर सुनावणी घेऊन त्याला दिलासा दिला. जामिनाचे कागदपत्रे घेऊन सलमानच्या वकिलांनी जोधपूर मध्यवर्ती कारागृह गाठले. ही कागदपत्रे तुरुंगाधिकार्‍यांना दाखविल्यानंतर तुरुंगाच्या अधिकार्‍यांनी सायंकाळच्या सुमारास त्याची सुटका केली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेल सलमान जोधपूर विमानतळावर पोहोचला व तेथून विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाला होता.

न्यायाधीशांसमोर तासभर जोरदार युक्तिवाद
बिश्‍नोई समाजाचे वकील महिपाल बिश्‍नोई यांनी सांगितले, की सलमान खानला 25 हजारांच्या प्रत्येकी दोन जातमुचलक्यांवर जामीन मिळाला आहे. तसेच, त्याला न्यायालयाच्या आदेशाविना त्याने देशाबाहेर जाऊ नये, तसेच सात मेरोजी त्याने स्वतः न्यायालयासमोर हजर व्हावे, अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत. तर सलमानचे वकील महेश बोरा यांनी जामिनासाठी अर्ज सादर केल्यानंतर सांगितले, की 20 वर्षापूर्वीच्या या खटल्यात सलमान खान नेहमीच जामिनावर तुरुंगाबाहेर राहात आला आहे. तसेच, त्याने नेहमीच न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. जेव्हादेखील त्याला न्यायालयासमोर बोलावले तेव्हा तो न्यायालयासमोर हजर झालेला आहे. त्याची पूर्वपीठिका पाहाता त्याला जामीन मंजूर करण्यात यावा. तर सरकारी वकील पोकराम यांनी सांगितले, की काळवीटांच्या शवविच्छेदन अहवाल व अन्य पुराव्यांद्वारे सलमान दोषी सिद्ध झालेला आहे. त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला जामीन देण्यात येऊ नये. बिश्‍नोई समाजाच्या वकिलांनीदेखील सलमानला शिक्षा देण्यात आलेली असल्याने त्याला जामीन देऊ नये, अशी विनंती सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांना केली. परंतु, न्यायाधीशांनी वैयक्तिक जातमुचलक्यावर व काही अटी व शर्तीवर सलमान खानला जामीन मंजूर केला. यावेळी दोन्ही बाजूने तब्बल तासभर युक्तिवाद करण्यात आला होता.

7 मेरोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर रहावे लागणार
अवघ्या 48 तासांत जामिनावर सुटका झाल्यानंतर सलमान खान हा त्याचा अंगरक्षक शेरा व त्याच्या दोन बहिणी अर्पिता व अलवीरा यांच्यासह विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाला होता. कारागृहाबाहेर त्याच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्याला विमानतळावर हलविण्यात आले. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने आता आपणास तणावमुक्त वाटत असल्याचे सांगितले. 7 मेरोजी त्याला पुन्हा एकदा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर रहावे लागणार असून, तूर्त त्याला 25 हजार रुपयांचे प्रत्येकी दोन बॉण्ड भरावे लागले आहेत. जोधपूरचे व्यावसायिक राजकुमार शर्मा व चंपालाल सोनी यांनी सलमान याचा जामीन घेतला असून, दोघांनीही 50 हजारांचा बॉण्ड न्यायालयात भरला होता.