‘सल्ल्याची’ पाच घरफोडी केल्याची कबूली; साडेसात लाखांचा ऐवज हस्तगत

0

जळगाव। स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ओंकारनगरातील घरफोडी प्रकरणी2 पकडलेला अट्टल गुन्हेगार सुनील ऊर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील याने चौकशीत जळगाव शहरासह पारोळ्यात पाच ठिकाणी घरफोडी केल्याची कबूली दिली असून त्याने 7 लाख 59 हजार 137 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला आहे. यातच सल्ल्या हा एकेकाळी’महाराष्ट्र केसरी ’सारख्या मानाच्या स्पर्धेत सहभागी झालेला, कोट्यवधींची मालमत्ता नावावर असलेला एक पहिलवान वाईट संगत लागल्यामुळे अक्षरश: वाया जाऊन अट्टल घरफोड्या बनल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. यातच पारोळा येथील सधन, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या सल्ल्याचा भाऊ गुप्तचर खात्यात नोकरीस असून त्याची बहीणही उच्च शिक्षित आहे. सल्ल्यावर विविध ठिकाणी घरफोडी, दरोडा, खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली अटक
अट्टल गुन्हेगार सल्ल्या हा गुजरात येथील सबजेल येथून पॅरोलवर सुटल्यानंतर तो पुन्हा हजर झाला नव्हता. त्या दरम्यानात जळगाव शहरासह पारोळ्यात घरफोड्या झाल्यात यातच स्थानिक गुन्हे शाखा पथकाला सल्ल्याचा घरफोड्यांमध्ये हात असून तो जळगाव शहरात विद्यार्थ्यांच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे पोलिसही चकित झाले. त्या माहितीच्या आधारावर पोलिस अधीक्षक सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंदेल यांच्या पथकातील सपोनि. प्रकाश वानखेडे, मनोहर चौधरी, अशोक चौधरी, शशिकांत पाटील, रमेश चौधरी, सुशिल पाटील, मिलींद सोनवणे, रामकृष्ण पाटील, विलास पाटील, मनोज दुसाने, महेश पाटील, रविंद्र चौधरी, दिपक पाटील, प्रविण हिवराळे, दर्शन ढाकणे आदींच्या पथकाने विद्युत कॉलनीत सापळा रचला परंतू तो मिळून आला नाही. यानंतर माहेजी येथे असल्याची माहिती मिळताच त्याला 10 मार्च रोजी पथकाने माहेजी येथून सापळा रचून अटक केली.

सल्या जाणार होता पटीयाला
घरफोड्या केल्यानंतर सल्लया हा पटीयाला येेथे आखाडा चालवणार्‍या मित्राकडे जावून तेथे पहेलवानीचे प्रशिक्षण घेणार होता. परंतू त्याला पटीयाला जाण्याअगोदरच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. सल्ल्याऊर्फ सुनील लक्ष्मण पाटील (वय 30) हा पारोळ्यातील सधन कुटुंबातील पहिलवान तरुण, महाराष्ट्र केसरी सारख्या मानाच्या स्पर्धेत तो चौथ्या क्रमांकापर्यंत पोहोचला. मोठा भाऊ गुप्तचर खात्यात, तर बहीण उच्च शिक्षित आहे. त्याच्या नावावर वडिलोपार्जित शेती ,जमीन, जळगावात मोठा भूखंड अशी कोट्यवधींची मालमत्ता आहे.

या ठिकाणी केल्या घरफोड्या
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सल्याला पकडल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. चौकती दरम्यान त्याने जळगाव शहरासह पारोळा येथे पाच ठिकाणी घरफोड्या केल्याची कबूली दिली. यात पारोळा, जळगाव शहरातील त्रिमुर्ती कॉलनी, रायसोनी नगर, ओंकारनगरात तसेच शहर पोलिस स्टेशन हद्दीत घरफाडी केल्याची माहिती त्याने दिली आहे. यातच सल्याने 7 लाख 59 हजार 137 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस आता सल्या याचा गुरू कैलास नवघरे यांच्या शोधार्थ आहे.