‘सवाई’च्या स्वरयात्रेस सनई वादनाने प्रारंभ!

0

पुणे । जाई कोण काशी । कोण जाई मक्का । आणि कोण जाई । पंढरी त । वारकरी आम्ही । न्हाऊ नादब्रम्हे । विठाई आमची ‘स वा ई’ त । वर्षभर चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहणारा रसिकजन बुधवारी सुखावला. सवाई गंधर्व महोत्सवाचे हे प्रथम पुष्प! विशाल स्वरमंच, रसिक प्रेक्षकांचा मेळावा, आणि अनेक जेष्ठ, श्रेष्ठ कलावंतांच्या मांदियाळीत आज 65व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात झाली.

रियाजाला ‘शॉर्टकट’ नसतो
‘अंतरंग’ या कार्यक्रमात श्रीनिवास जोशी यांनी कौशिकी यांची मुलाखत घेतली. त्या म्हणाल्या, रागसंगीत गायनाच्या तयारीसाठी 15 ते 20 वर्षे मोबाईल बाजूला ठेवून प्रामाणिकपणे रियाज करणे आवश्यक असते. साधकाची गायनक्षमता कितीही चांगली असली तरी या रियाजाला ‘शॉर्टकट’ नसतो. मी घरात वर्षानुवर्षे बाबांना तासंतास रियाज करताना पाहिले. म्हणून हे शक्य आहे हे मला पटले. आपल्या वडिलांचे गुरू, आपले गुरू आणि पतियाळा घराण्याच्या वैशिष्ट्यांविषयीही कौशिकी भरभरून बोलल्या. कोलकात्याच्या ’संगीत रीसर्च अकादमी’त अनेकांकडून शिकण्याची संधी मिळाली, शोभा गुर्टू यांच्याकडून शिकण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पहिल्यांदा गायल्याची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, एके दिवशी दूरध्वनी आला. पलीकडून एक प्रभावी आवाज ऐकू आला-मी भीमसेन जोशी बोलतो आहे… मला त्यांच्याशी काय बोलावे हे देखील सुचले नाही. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी माझी अवस्था आणखी वाईट झाली. माझ्याआधी पं. शिवकुमार शर्मा यांचे सादरीकरण होते आणि माझ्यानंतर पं. जसराज यांचे गायन होणार होते. मी थरथर कापत मंचावर गेले, तर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत असे दृष्य होते.

मधुकर धुमाळ यांचे सनई सूर
मधुकर धुमाळ यांच्या सनईच्या स्वरसादाने झालेली ही सुरुवात सहकलाकारांच्या साथसंगतीने अधिकच बहारदार झाली. यासाठी तबल्याच्या साथीला भरत कामत, तसेच विजय वेद बन्सी होते. लोकप्रिय संगीतकार जसे ए. आर. रहेमान यांचा स्वदेश, लक्ष्मीकांत प्यारेलाल याचे सौदागर, राजेश रोशन यांचा गोयल, अनु मलिक यांचा रेफ्युजीमध्ये सनई वादन केले आहे. शिवाय दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मधुकर धुमाळ यांच्या राग भीमपलासने सनई वादनाला सुरुवात करण्यात आली.

डॉ. राजपूत यांचे गायन
सनई वादनानंतर डॉ. विजय राजपूत यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘पुरिया कल्याण’ने सुरुवात केली. त्यांनी सादर केलेल्या ‘मोरे कान्हा जो आए पलटके’ या पिलू रागातील ‘होरी’ने विशेष दाद मिळवली. ‘रघुवर तुमको मेरी लाज’ या भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. अविनाश दिघे (हार्मोनियम), रवींद्रकुमार सोहोनी (तबला), प्रो. डेव्हिड क्लार्क (तानपुरा व गायन), सुनील रावत (तानपुरा), वसंत गरुड (टाळ) यांनी त्यांना साथसंगत केली.

मिरजकरांतर्फे तनपुर्‍यांची अनमोल भेट…
सोन्याच्या फुलांचे नक्षीकाम केलेल्या पाच तानपुर्‍यांच्या जोड्या मिरजकरांतर्फे आर्य संगीत प्रसारक मंडळाला सुपूर्द करण्यात आल्या. बाळासाहेब मिरजकर, साजिद युसुफ मिरजकर यांनी श्रीनिवास जोशी यांना हे तानपुरे सुपूर्द केले. या अनोख्या तानपुर्‍यांचे वैशिष्ट म्हणजे यावर सोन्याचा मुलामा चढवलेल्या फुलांची नक्षी नैसर्गिक रंग वापरून रेखाटण्यात आली आहे.